पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी धक्कादायक डाव

    दिनांक :13-Jul-2026
Total Views |
नागपूर
parole accused मुलाच्या ऑपरेशनसाठी पेरोलवर बाहेर आलेल्या एका सराईत गुन्हेगाराने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी धक्कादायक डाव आखला. पोलिसांचा तपास आपल्या मागावर आल्याची माहिती मिळताच, मुलाच्या ऑपरेशनपूर्वीच "माझा पेरोल घेण्याचा उद्देश पूर्ण झाला आहे, आता मला तुरुंगातच ठेवा," असे सांगत अफरोज उर्फ भाईजान पठाण याने स्वतःहून अमरावती कारागृहात परत जाऊन हजेरी लावली. मात्र, नागपूर ग्रामीण पोलिसांच्या सखोल तपासापुढे त्याचा हा डाव निष्फळ ठरला आणि नागपूर जिल्ह्यातील फुकेश्वर परिसरात चाकूचा धाक दाखवत एका कुटुंबाला लुटल्याप्रकरणी अखेर त्याला अटक करण्यात आली.
 
 

parole accused returns to jail to evade police arrested in nagpur robbery case  
बुटीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फुकेश्वर शिवारात ५ जुलैच्या सायंकाळी ही लुटीची घटना घडली होती. अफरोज उर्फ भाईजान पठाण या पेरोलवर बाहेर आलेल्या सराईत गुन्हेगाराने आपल्या एका साथीदाराच्या मदतीने कृषी विभागातील कर्मचारी सुहास हजारे आणि त्यांच्या कुटुंबीयांना चाकूचा धाक दाखवत लुटले. हजारे हे आपल्या कुटुंबासह कारने प्रवास करत असताना ही घटना घडली. विशेष म्हणजे, या लुटीतील मुख्य आरोपी अफरोज उर्फ भाईजान पठाण हा अमरावती कारागृहातून पेरोलवर बाहेर आला होता आणि पेरोलच्या कालावधीतच त्याने साथीदाराच्या मदतीने हा गुन्हा केला होता.या घटनेदरम्यान हजारे यांच्या कारच्या मागील सीटवर बसलेल्या त्यांच्या मुलीने संपूर्ण प्रकार मोबाईलमध्ये चित्रित केला होता. या फुटेजमध्ये दिसणाऱ्या चेहऱ्यांच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला. घटनास्थळापासून तब्बल २५ किलोमीटर परिसरातील प्रत्येक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. या तपासातून पोलिसांचा शोध अफरोज पठाणच्या खरबी परिसरातील वास्तव्यास जाऊन पोहोचला.दरम्यान, पोलिसांकडून खरबी परिसरात अफरोज पठाणचा फोटो दाखवत त्याचा शोध सुरू असल्याची माहिती त्याच्यापर्यंत पोहोचली. त्यानंतर मुलाच्या ऑपरेशनसाठी एक महिन्याच्या पेरोलवर अमरावती कारागृहातून बाहेर आलेल्या अफरोजने तातडीने पुन्हा तुरुंगात परतण्याचा निर्णय घेतला. १० आणि ११ जुलैच्या मध्यरात्री तो अमरावती कारागृहात पोहोचला आणि "मी पेरोलवरून परत आलो असून माझे काम पूर्ण झाले आहे. आता मला तुरुंगात घ्या," अशी विनंती करत स्वतःहून कारागृहात दाखल झाला. बाहेर असताना त्याने आणखी एक गंभीर गुन्हा केल्याची माहिती कारागृह प्रशासनाला नसल्याने अधिकाऱ्यांनी त्याला नियमित प्रक्रियेनुसार पुन्हा कारागृहात दाखल करून घेतले.
दरम्यान, नागपूर parole accused  पोलिसांचा तपास अफरोज पठाणच्या घरापर्यंत पोहोचला असता, त्याच्या कुटुंबीयांनी तो अनेक दिवसांपासून तुरुंगात असल्याचा बनाव केला. मात्र, पोलिसांनी अमरावती कारागृह प्रशासनाशी संपर्क साधल्यानंतर संपूर्ण प्रकार उघड झाला. अफरोज हा पेरोलवर बाहेर होता आणि ११ जुलैच्या रात्रीच तो पुन्हा कारागृहात परतल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर नागपूर पोलिसांनी अमरावती कारागृहातून त्याला लुटीच्या गुन्ह्यात ताब्यात घेतले. तसेच त्याच्या साथीदारालाही वाठोडा परिसरातून अटक करण्यात आली.पोलिसांच्या कारवाईपासून बचाव करण्यासाठी सराईत गुन्हेगाराने चक्क तुरुंगातच लपण्याचा डाव आखला होता. मात्र, नागपूर पोलिसांच्या बारकाईने आणि सखोल तपासामुळे त्याचा हा प्रयत्न अखेर पूर्णपणे फसला.