मुंबई,
7 year old girl sexually assaulted मुंबईतील पायधुनी परिसरात घडलेल्या एका संतापजनक घटनेने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. एका गोदामात वॉचमन म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीने अवघ्या ७ वर्षांच्या मुलीवर शौचालयात लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असून, या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला तातडीने अटक केली आहे. घटनेनंतर पीडित मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती परिसरात पसरताच मोठ्या संख्येने नागरिक पायधुनी पोलीस ठाण्याबाहेर जमा झाले. आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी करत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. काही काळ मुख्य रस्त्यावर आंदोलन झाल्याने वाहतुकीवरही परिणाम झाला आणि परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
दरम्यान, परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर पायधुनी पोलीस ठाण्यात पोहोचले असता, संतप्त नागरिकांनी त्यांनाही घेरून न्यायाची मागणी केली. पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढत परिस्थिती नियंत्रणात आणली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
या प्रकरणाबाबत मुंबई पोलीस दक्षिण विभाग-३ चे डीसीपी विजयकांत मंगेश सागर यांनी माहिती देताना सांगितले की, तक्रार मिळताच आरोपीला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याविरुद्ध पॉक्सो कायद्यासह इतर संबंधित कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा सखोल तपास सुरू असून अटक करण्यात आलेल्या आरोपीला उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. प्राथमिक माहितीनुसार, आरोपी पायधुनीतील एका गोदामात चौकीदार म्हणून कार्यरत होता.