‘बदला निश्चित आहे‘....इराणकडून टार्गेट लिस्ट प्रसिद्ध

वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर फोटो छापले

    दिनांक :13-Jul-2026
Total Views |
तेहरान
iran releases target list इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर मध्यपूर्वेतील तणाव आणखी वाढला आहे. अशातच इराणमधील एका सरकारी वृत्तपत्राने जगातील अनेक प्रभावशाली नेत्यांची कथित ’टार्गेट लिस्ट’ प्रसिद्ध केल्याचा दावा समोर आला आहे. या यादीमुळे आंतराष्ट्रीय स्तरावर मोठी खळबळ उडाली असून विविध देशांच्या सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्याचे सांगितले जात आहे.
 
iran releases target list
 
11 जागतिक नेत्यांचा समावेश
इराणच्या ’हमशहरी’ या सरकारी वृत्तपत्राने आपल्या पहिल्या पानावर जगातील 11 प्रभावशाली नेत्यांची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. वृत्तपत्राने ही छायाचित्रे कैद्यांच्या पोशाखासारख्या स्वरूपात दाखवत त्यावर मोठ्या अक्षरांत ‘बदला निश्चित आहे‘ असा संदेश प्रसिद्ध केल्याचे वृत्त आहे. या यादीत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू, अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, ब्रिटनचे पंतप्रधान कीअर स्टार्मर, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ, संरक्षणमंत्री पीट हेगसेथ, फ्रान्सचे राष्ट्रध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्झ यांच्यासह इतर काही नेत्यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे.
 
खामेनेईंच्या मृत्यूस जबाबदार ठरवल्याचा दावा
वृत्तांनुसार, या नेत्यांना अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूस थेट जबाबदार ठरवत वृत्तपत्राने त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या कथित यादीमुळे आंतराष्ट्रीय राजकारणात तणाव वाढला असून अनेक देशांनी सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत केल्याचे वृत्त आहे.
 
युरोपीय देशांवरही आरोप
इराणने अमेरिका आणि इस्रायलसोबतच काही युरोपीय देशांवरही आरोप केले आहेत. युद्धादरम्यान इराणवरील हल्ल्यांचा निषेध करण्यात हे देश अपयशी ठरल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच अमेरिकन लष्करी विमानांना आपल्या हवाई हद्दीचा वापर करण्यास परवानगी देऊन त्यांनी अप्रत्यक्षपणे हल्ल्यांना मदत केल्याचा दावाही इराणकडून करण्यात आला आहे.