भट्टीच्या भगतांना ठेचा!

    दिनांक :13-Jul-2026
Total Views |
अग्रलेख...
Shahzad Bhati वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफार्र्म्सचा वापर करीत भारतातील काही भरकटलेल्या (?), गरीब आणि शिक्षित पण अडाणी युवकांना जाळ्यात ओढून त्यांच्यामार्फत घातपाती कारवाया करता येतील काय, याची चाचपणी पाकिस्तानातील गँगस्टर शहजाद भाटी ऊर्फ भट्टी याने केल्याचा प्राथमिक पुरावा सापडला आहे. 10 जुलैला अर्थात शुक्रवारी दहशतवादविरोधी पथकाने महाराष्ट्रात एकाचवेळी राज्यात 102 ठिकाणी छापेमारी केली. केंद्रीय गुप्तचर संस्था आणि राज्यातील गुप्तचर संस्थांना मिळालेल्या माहितीच्या आधारे एटीएसने नेहमीच अतिसंवेदनशील आणि देशविघातक कारवायांमध्ये सक्रिय असलेल्या शहरांमध्ये धाडी टाकल्या. त्यांनी अशा अनेक कारवाया रोखल्या. गुरुवारी (ता. 9) रात्रीपासूनच दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत झाडाझडती घेतली. यामध्ये मुंबई, ठाणे, कुर्ला, बांद्रा, मीरा रोड, भायंदर, सांगली, सातारा, छ. संभाजीनगर आणि विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, गडचिरोली व वर्धा या शहरांचा समावेश होता. छाप्यांमध्ये एकूण 111 पेक्षा जास्त 'भट्टीप्रेमीं'ना चौकशीसाठी ताब्यात घेतले. धर्मासाठी आंधळे होऊन काहीही करण्यासाठी तयार असलेल्या या युवकांच्या सोशल मीडिया हालचालींवर लक्ष ठेवून आणि अनोळखी प्लॅटफार्मचा वापर करीत त्यांच्याशी संवाद साधण्याचे काम शहजाद भट्टीची संघटना करीत असते.
 

Shahzad Bhati  
 
आर्थिक लाभ आणि धर्मविषयक संदेश देऊन युवकांचे स्थानिक पातळीवर जाळे निर्माण करण्याचे काम यामार्फत केले जाते. 1990 नंतर पाकिस्तानने स्थानिक पातळीवर युवकांचे जबरदस्त जाळे निर्माण करीत जम्मू-काश्मीरला अशांत करण्याचे काम केले. हेच युवक नंतर स्लीपर सेलची भूमिका पार पाडत असतात. पहलगाम हल्ल्यासाठी आलेल्या दहशतवाद्यांना आश्रय देण्याचे काम अशाच स्लीपर सेलमधील सदस्यांनी केल्याचे उघड झाले आहे. आपल्याला साहाय्यभूत ठरेल, अशा राज्यांमध्ये कारवाया वाढविण्याचे काम शहजाद भट्टी करीत आहे. झारखंड आणि पंजाब ही याची ताजी उदाहरणे. कमी क्षमतेची शस्त्रे आणि स्फोटकांचा वापर करीत समाजात दहशत माजविणे आणि परिस्थितीचा अदमास घेण्याचे काम भट्टी करीत असतो. मे आणि जून महिन्यात पंजाबमध्ये पोलिसांवर गोळीबार केल्याच्या घटनांमागे शहजादची संघटना असल्याचे स्पष्ट झाले. गेल्या महिन्यात 17 जूनला झारखंडमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात झालेला बॉम्बस्फोटही भट्टीनेच घडवून आणल्याचा दाट संशय आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील छापेमारीच्या दोन दिवस अगोदर भट्टी तसेच पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयशी संबंधित दोन मोड्यूल्सचा भंडाफोड केला. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने दिल्ली आणि पंजाबातून सहा दहशतवाद्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या जवळून शस्त्रे आणि डिजिटल माहिती जप्त केली. दिल्लीसह देशभरातील गर्दीच्या ठिकाणी पेट्रोल बॉम्बचा वापर करीत स्फोट घडविण्याची कुटिल योजना या सहा जणांनी आखल्याचे चौकशीत उघड झाले. हाच धागा पकडून दोन दिवसांनंतर राज्यात एटीएसला मोठी कारवाई करावी लागली.
 
 
अशा लोकांचा देशद्रोह म्हणा की गद्दारी, भारताला त्रास होतच आला आहे. शेकडो वर्षांपासून हे चालत आलेले आहे आणि याचे पुरावे इतिहासातही आहेत. ज्या ताटात खाल्लेे, त्याच ताटाला लाथ मारणारी ही प्रवृत्ती. ती आणखी बळावत चालली आहे, हा खरा चिंतेचा विषय. शिक्षणाने माणूस सुज्ञ होतो, भल्याबुऱ्याची त्याला जाणीव होते, असे जे म्हटले जाते, त्याला धर्मांध दहशतवादी अपवाद आहेत. डॉक्टर, इंजिनीयर झालेले युवकही दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी झाल्याची उदाहरणे डोळ्यासमोर आहेत. खरे तर हे अस्तनीत लपलेले विषारी साप आहेत. अज्ञानी, गरीब आणि भरकटलेले युवक म्हणत त्यांच्या देश आणि समाजविघातक कृत्यांवर पांघरूण घालण्याचे जे पाप काँग्रेसने दीर्घ काळ केले, त्याचे परिणाम आपण आता भोगत आहोत. शहजाद भट्टी हा पाकिस्तानी असून सध्या तो दुबईत व्यावसायिक म्हणून वावरत आहे. त्याचे 333 नावाने सोशल मीडियावर अकाऊंट असून त्याने आशियात फार मोठे डिजिटल नेटवर्क उभे केले आहे. तो अट्टल गुन्हेगार असून त्याच्यावर लाहोर आणि परिसरात चोरी, दरोडा, खून, लुटमारीचे शेकडो गुन्हे आहेत. माणूस म्हणूनही तो नीच असून त्याच्यावर 2015 मध्ये बलात्काराचा गुन्हाही दाखल झालेला आहे. पोलिसांच्या कचाट्यातून सुटण्यासाठी शहजादने दुबई गाठत प्रथम तेथे भंगाराचा व्यवसाय सुरू केला. नंतर हळूहळू त्याने दूध आणि कृषी उत्पादने विकण्याचे कामही सुरू केले. आज तो कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीचा मालक असून त्याला आता आयएसआयचे संरक्षण मिळाले आहे. 2013 मध्ये जो शहजाद पाकिस्तानी पोलिसांसाठी मोस्ट वाँटेड होता, तो आता पाकिस्तानच्या गळ्यातील ताईत झाला आहे. बलात्काराचा कलंक असलेल्या या शहजादने सोशल मीडियावरील आपल्या अकाऊंटचे नाव 333 असे मुद्दाम ठेवले आहे. अंकशास्त्रात 3 हा आकडा मन, शरीर आणि आत्मा यांना जोडणारा आणि सृजनाचे प्रतीक मानले जाते. तसेच मी तुमचा मार्गदर्शक असून देवदूत आहे, हे दर्शविण्यासाठीही 333 या आकड्याचा वापर केला जातो असे म्हणतात. याचाच अर्थ शहजाद भट्टी विशिष्ट धर्माच्या युवकांना आकर्षित करून त्यांच्यामार्फत भारतात अराजक निर्माण करण्याचा कट आखत होता किंवा आखतोय. जून महिन्यात दिल्ली पोलिसांनी आयएसआय संबंधित ज्या नऊ दहशतवाद्यांना अटक केली होती, त्यांनी टीटीएच या नव्या दहशतवादी गटाचा उल्लेख पोलिसांच्या चौकशीत केला होता. टीटीएचचा अर्थ होतो तो तेहरिक-ए-तालिबान हिंदुस्थान. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या धर्तीवर भारतातही असे नेटवर्क तयार उभारण्याच्या मागे शहजादचाच मेंदू असल्याची शक्यता सुरक्षा संस्थांनी व्यक्त केली आहे. हे नेटवर्क तयार करण्यासाठी भट्टीने प्रथम पंजाब, दिल्ली, हरयाणा, राजस्थान आणि उत्तरप्रदेशकडे लक्ष केंद्रित केले आहे. झारखंड, महाराष्ट्र आणि बिहारातही त्याचे चाहते निर्माण झालेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून युवकांना प्रथम लक्ष्य करणे, त्यांच्या धार्मिक भावना भडकाविणे आणि शेवटी त्यांच्याकडून दहशतवादी कृत्ये करवून घेण्याच्या कामात भट्टी आणि त्याचे नेटवर्क जुळलेले आहे. हे काम करण्यासाठी युवकांना भरपूर पैसे देण्याचे आणि विदेशात स्थायिक करून देण्याचे आमिषही दिल्याचे सुरक्षा संस्थांना मिळालेल्या सोशल मीडिया चॅटवरून उघड झाले आहे. पण त्यांचे मनसुबे यशस्वी होणार नाहीत.
 
 
कारण आता देश बदलला आहे. तो घरात घुसून मारतो हे Shahzad Bhati  भट्टीच्या पाठीराख्यांनी पाहिले आहे. असे शहजाद भट्टीसारखे किती आले आणि मातीत मिसळले: पण या देशाचे कुणीही वाकडे करू शकले नाही. कधीकाळी या देशात अल-कायदापासून तर अलिकडच्या पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या ‘द रजिस्टन्स फ्रंट’सारख्या जवळपास 18 इस्लामिक नावे असलेल्या दहशतवादी संघटना कार्यरत होत्या. आज त्यांचे नामोनिशाण जवळजवळ मिटले आहे. याच दहशतवादी संघटनांच्या उच्छादामुळे जम्मू-काश्मीरसह संपूर्ण भारत तीन दशके हिंसाचाराच्या घटनांनी रक्तबंबाळ झाला होता. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या कठोर उपोययोजनांमुळे दहशतवादी संघटनांचे म्होरके यमसदनी गेले आहेत. कधीकाळी पाकिस्तानचा ‘पोस्टर बॉय’ बुऱ्हान वानीने अख्खे काश्मीर खोरे अनेक वर्षे वेठीस धरले होते. 2016 मध्ये जुलै महिन्यात अनंतनाग जिल्ह्यातील कोकेरनाग येथे लष्कराने त्याचा फणा ठेचला आणि येथूनच सुरू झाली ती जम्मू-काश्मीर दहशतवादमुक्त करण्याची मोहीम. जे काश्मीर खोरे पाकिस्तानी, अफगाणी आणि अरब देशांतील दहशतवाद्यांनी बरबटले होते, ते आता मुक्तपणे श्वास घेत आहे. पैसे घेऊन दगडफेक करणारी पिलावळ आता बिळात लपून बसली आहेत. भट्टी आपला नाही; त्याच्या डावपेचांना साथ देणारे आपल्या देशात राहतात हे या घटनांत दिसले. भट्टीचा बंदोबस्त होईलच. भारतात राहून भट्टीसारख्या लोकांना साथ देणाऱ्यांना विनाविलंब ठेचले पाहिजे. भट्टीसारख्यांचे भगत शोधून संपवले पाहिजेत.