बोगस बियाणांमुळे दुबार पेरणीचे संकट

    दिनांक :13-Jul-2026
Total Views |
नवनीत राणा यांचा पाहणी दौरा
कृषिमंत्र्यांना दिली फोनवरून माहिती
 
अमरावती, 
Spurious seeds बोगस बियाणांमुळे हजारो शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या पृष्ठभूमीवर भाजपा नेत्या व माजी खासदार नवनीत राणा यांनी जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये दौरा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतांची पाहणी केली. अनेक ठिकाणी पहिल्याच पेरणीनंतर बियाणांची उगवण न झाल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे वास्तव यावेळी समोर आले. पाहणीदरम्यान शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या. बोगस बियाणांमुळे संपूर्ण हंगामच धोक्यात आला असून कर्जबाजारीपणा वाढण्याची भीती असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
 
 
rana
 
यावेळी संबंधित कृषी अधिकाऱ्यांशी चर्चा करताना नवनीत राणा यांनी स्पष्ट शब्दांत निर्देश दिले की, बोगस बियाणांचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांवर तत्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या अशा कंपन्यांना कोणतीही सूट देता कामा नये. तसेच नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांना आठ दिवसांत नुकसानभरपाई मिळावी, यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्यात यावी. प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. लगेच त्यांनी कृषिमंत्र्यांशी दूरध्वनीवर चर्चा करून संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली व दोषी कंपन्यांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित मदत देण्याची मागणी केली.
 
 
त्यांनी कृषी विभागाला प्रत्येक गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे पूर्ण करून अहवाल शासनाकडे सादर करण्याच्या सूचना दिल्या. बोगस बियाणांचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना ब्लॅक लिस्ट करून त्यांचे परवाने रद्द करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. यावेळी तालुका कृषी अधिकारी अक्षय क्षीरसागर, पंचायत समिती कृषी अधिकारी रविकांत उईके, प्रवीण मडगे, उपेंद्र बछले, रवींद्र गवई, आसिफ खान, आनंदसिंग गौर, तमिज शहा, बबलू वानखडे, अमोल धोत्रे, संतोष ठाकरे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.