नवविवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी ६ जणांना अटक

    दिनांक :13-Jul-2026
Total Views |
तक्रारीत धक्कादायक माहिती उघड
वर्धा, 
suicide case दोन दिवसांपूर्वी एका नवविवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी सासरच्या आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आल्याची माहिती आहे. याप्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. रोशनी मोहिते (२१) असे मृत तरुणीचे नाव आहे.
 
 
atak dks
 
संभाजीनगर जिल्ह्यातील खुल्ताबाद तालुक्यातील गदाना येथील रोशनी जाधव हिचा विवाह २७ मार्च २०२४ रोजी गणेशपूर (हेलोडी) येथील विनोद मोहिते याच्यासोबत झाला. लग्नानंतर दोन महिने सुखाने संसार केल्यानंतर पतीसह सासरच्या मंडळींनी छळ सुरू केला. पती विनोद हा नोकरीवर असल्याने तो नोकरीच्या ठिकाणी राहायचा तर रोशनीला तो त्याच्या गणेशपूर येथे आई-वडिलांकडे ठेवायचा. पती विनोद हा नेहमी रोशनीशी वाद घालून तिच्याकडे घटस्फोटाची मागणी करायचा. सोबतच माहेरवरून गाडीसाठी ५ लाख रुपये आण, पैसे नाही दिले तर विहिरीत ढकलून देईल, अशी धमकीही द्यायचा. सोबतच दैनंदिन लागणार्या वस्तूही तिला देत नसत. घरातील संपूर्ण कामासोबतच शेतीच्या कामालाही जुंपायचे. विनोदचे दुसर्या मुलीसोबत प्रेम प्रकरण असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे चार महिन्यांपूर्वी तिचा एका रुग्णालयात गर्भपात केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले. रोशनी नेहमी विनोदकडे आपण सोबत राहू, असे म्हणायची. मात्र, विनोदने मला तुला नांदवायचे नाही, तू मला घटस्फोट दे, असे म्हणून मारहाण करायचा. या सर्व बाबी रोशनीने आपल्या आईवडिलांकडे कथन केल्या होत्या.
दरम्यान, ११ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता रोशनीचे सासरे अंबादास मोहिते यांचा फोन आला. रोशनीची प्रकृती गंभीर असल्याची बातमी मिळाली. रोशनीच्या नातेवाईकांनी तात्काळ गणेशपूर गाठले. त्यावेळी रोशनीने गळफास घेतल्याचे दिसून आले. मात्र, ही आत्महत्या नसून तिला प्रवृत्त केल्याची तक्रार रोशनीच्या नातेवाईकांनी सिंदी रेल्वे पोलिसात केली. पती विनोद मोहिते, सासरे अंबादास मोहिते, सासू कुसूम मोहिते, दीर सुनील मोहिते, किशोर मोहिते, जाऊ निमा मोहिते, अरुणा मोहिते, नणंद सुनंदा जाधव यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंद केला.
 
 
दरम्यान, पती विनोद मोहिते, सासरे अंबादास मोहिते, दीर सुनील व किशोर मोहिते, नणंद निमा मोहिते सर्व रा. गणेशपूर (हेलोडी) यांना अटक केली तर अरुणा मोहिते व सुनंदा जाधव फरार आहेत. न्यायालयात हजर केले असता सहाही जणांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.