‘ताज हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवलाय’

दाऊदच्या नावाने धमकीचा फोन मुंबई पोलीस दलात खळबळ

    दिनांक :13-Jul-2026
Total Views |
मुंबई
taj hotel bomb मुंबईतील प्रसिद्ध ताज हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा फोन शनिवारी मध्यरात्री आल्याने मुंबई पोलीस दलात खळबळ उडाली. दक्षिण मुंबईतील ताज हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याचा दावा करणारा हा फोन पोलीस नियंत्रण कक्षाला करण्यात आला होता. विशेष म्हणजे धमकी देताना फोन करणाऱ्या व्यक्तीने दाऊदच्या नावाचा उल्लेख केल्याने सुरक्षा यंत्रणा तातडीने सतर्क झाली.
 

taj hotel bomb threat phone call traced to navi mumbai turbhe police begin investigation 
धमकीचा फोन आल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षात शनिवारी रात्री हा फोन आला होता. फोन करणाऱ्या व्यक्तीने दाऊदने हॉटेल ताजमध्ये बॉम्ब ठेवल्याचे सांगितले. या घटनेची माहिती तात्काळ मुंबई पोलिसांना देण्यात आली आणि त्यानंतर सुरक्षा यंत्रणा कामाला लागली.माहिती मिळताच कुलाबा पोलिसांसह बॉम्बशोधक व नाशक पथक (बीडीडीएस) ताज हॉटेलमध्ये दाखल झाले. बीडीडीएसच्या पथकाने हॉटेलमधील प्रवेशद्वार, स्विमिंग पूल, विविध हॉल आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणांची कसून तपासणी केली. मात्र तपासणीदरम्यान कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही.
तपासादरम्यान हा धमकीचा फोन नवी मुंबईतील तुर्भे परिसरातून आल्याचे स्पष्ट झाले आहे. फोन करणाऱ्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी स्वतंत्र पथक तयार केले असून, पुढील तपास सुरू आहे.दरम्यान, अमरनाथ यात्रेशी संबंधित एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर बॉम्बसंदर्भातील धमकीचा संदेश आल्यानेही खळबळ उडाली आहे. अमरनाथ यात्रेसाठी तयार करण्यात आलेल्या ‘अमर सेतु’ या व्हॉट्सअॅप ग्रुपवर ‘मैं अमरनाथ यात्रा में बॉम्ब रखनेवाला हूँ’ असा धमकीचा संदेश मोबाईलवरून पोस्ट करण्यात आला होता.या संदेशाची माहिती काश्मीर पोलीस नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांनी मुंबई पोलीस महासंचालक नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर धमकीचा संदेश पाठवणाऱ्या मोबाईलधारकाची माहिती घेण्यात आली. तपासात संबंधित व्यक्ती हनुमान नगर, आकुर्डी रोड, कांदिवली (पूर्व) येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मुंबई पोलीस करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.