हैदराबाद,
telangana news तेलंगणातील नरसिंगी परिसरात एका उपनिरीक्षकाने आपल्या अवघ्या साडेसहा वर्षांच्या नातीला कार चालवू दिल्याचा प्रकार समोर आला असून, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई केली आहे. या प्रकरणात संबंधित उपनिरीक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून विभागीय चौकशीची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये लहान मुलगी कार चालवत असल्याचे दिसत असून, उपनिरीक्षक तिच्या शेजारी बसलेले आहेत. दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये काही स्थानिक नागरिक या प्रकाराचा निषेध करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यानंतर सायबराबाद वाहतूक पोलिसांनी घटनेची दखल घेत तपास सुरू केला. सायबराबाद पोलिसांनी 'एक्स'वरील अधिकृत पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, नरसिंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीला वाहन चालवू दिल्याप्रकरणी पुजारी तिरुपती यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १२५ तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ आणि १८० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले.
दरम्यान, तेलंगणा पोलिसांनी इन्स्टाग्रामवरील पोस्टद्वारे सांगितले की, राज्याचे पोलीस महासंचालक (डीजीपी) सी. व्ही. आनंद (आयपीएस) यांनी सायबराबाद पोलीस आयुक्तांना संबंधित उपनिरीक्षकाला तातडीने निलंबित करण्याचे आणि त्यांच्याविरोधात विभागीय चौकशी सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. या घटनेनंतर सोशल मीडियावरही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून, अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन देणे अत्यंत धोकादायक असून अशा निष्काळजीपणामुळे गंभीर अपघात घडू शकतात, अशी चिंता अनेकांनी व्यक्त केली आहे.