आकडेवारी म्हणते... भारतच भारी!

    दिनांक :13-Jul-2026
Total Views |
बर्मिंगहॅम,
india comes out on top भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला १४ जुलैपासून बर्मिंगहॅमच्या एजबास्टन मैदानावर सुरुवात होत आहे. या मालिकेपूर्वी झालेल्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारताला ४-० असा पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे आता वनडे मालिकेत दमदार कामगिरी करत त्या अपयशाची भरपाई करण्याच्या निर्धाराने भारतीय संघ मैदानात उतरणार आहे.
 
india comes out on top
 
भारत आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत एकूण ११० एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी भारताने ६१ सामन्यांत विजय मिळवला असून इंग्लंडच्या खात्यात ४४ विजय आहेत. याशिवाय तीन सामने अनिर्णित राहिले, तर दोन सामने बरोबरीत सुटले. या आकडेवारीवरून एकदिवसीय क्रिकेटमध्ये इंग्लंडविरुद्ध भारताचे वर्चस्व स्पष्ट दिसून येते.
 
मात्र इंग्लंडच्या भूमीवरील चित्र काहीसे वेगळे आहे. भारताने इंग्लंडमध्ये आतापर्यंत ४४ एकदिवसीय सामने खेळले असून त्यापैकी १८ सामने जिंकले आहेत, तर २३ सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे. एक सामना बरोबरीत सुटला असून दोन सामने अनिर्णित राहिले आहेत. त्यामुळे घरच्या मैदानावर इंग्लंडचे पारडे तुलनेने जड राहिले आहे. मात्र २०२२ मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडमध्ये झालेली एकदिवसीय मालिका २-१ अशा फरकाने जिंकत यजमानांना धक्का दिला होता.
 
या मालिकेतील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचे एकदिवसीय संघात पुनरागमन. २०२३ नंतर तो प्रथमच भारताकडून वनडे सामना खेळणार असून वेगवान गोलंदाजीची धुरा त्याच्याकडे असेल. त्याच्यासोबत प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव आणि गुरनूर ब्रार यांचा गोलंदाजी ताफ्यात समावेश करण्यात आला आहे. दुखापतीमुळे हर्षित राणा या मालिकेला मुकणार असून फिरकीची जबाबदारी कुलदीप यादव सांभाळणार आहे. फलंदाजीत रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या अनुभवावर भारतीय संघाची मोठी भिस्त असेल.