वारकऱ्यांच्या दिंडीत मृत्यूचा कहर जागीच तिघांचा अंत

    दिनांक :13-Jul-2026
Total Views |
पुणे
ashadhi wari आषाढी वारीदरम्यान पुणे जिल्ह्यातील जेजुरी परिसरात सोमवारी सकाळी अत्यंत भीषण अपघात घडला. भरधाव टेम्पोने वारकऱ्यांच्या दिंडीला जोरदार धडक दिल्याने तीन महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर अनेक वारकरी गंभीर जखमी झाले. या दुर्घटनेनंतर घटनास्थळी मोठी खळबळ उडाली असून जखमींना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 

three women devotees killed after tempo rams wari procession near jejuri in pune 
मिळालेल्या माहितीनुसार, संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोमवारी सासवडवरून जेजुरीच्या दिशेने प्रस्थान करत होती. जेजुरीमध्ये पालखी दाखल झाल्यानंतर भंडाऱ्याची उधळण करण्याची परंपरा आहे. याच वारीदरम्यान दिंडीसोबत असलेला एक टेम्पो अचानक अनियंत्रित झाला आणि थेट वारकऱ्यांच्या दिंडीत घुसला. या दिंडीत महिला आणि पुरुष अशा मोठ्या संख्येने वारकरी सहभागी होते. टेम्पोच्या जोरदार धडकेमुळे अनेक वारकरी गंभीर जखमी झाले. त्यापैकी तीन महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला असून जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.सासवड-जेजुरी मार्गावरील या अपघातामुळे परिसरात एकच धावपळ उडाली. भरधाव टेम्पोने दिंडीतील अनेक वारकऱ्यांना चिरडल्याने दुर्घटनेचे गांभीर्य अधिक वाढले. अपघातात जखमी झालेल्यांपैकी दोन वारकऱ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. टेम्पो अचानक अनियंत्रित कसा झाला, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नसून या घटनेमागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.जेजुरीजवळील सासवडे गावाजवळ हा अपघात घडल्याची माहिती मिळत आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, भरधाव वेगाने आलेला टेम्पो अचानक दिंडीत घुसला. या धडकेत १५ ते १६ वारकरी जखमी झाले असून त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे. काही जखमींची प्रकृती अद्याप नाजूक असल्याचे सांगण्यात येत आहे. मृत महिला सांगली जिल्ह्यातील दिग्रस परिसरातील असल्याची माहिती समोर आली आहे.
 
 
या दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा ashadhi wari पवार यांनी ‘एक्स’वर शोक व्यक्त करत म्हटले आहे, “आज सासवड–जेजुरी मार्गावर झालेली दुर्घटना अत्यंत वेदनादायी आणि मन हेलावून टाकणारी आहे. या अपघातात ज्या तीन वारकरी भगिनींचा दुर्दैवी मृत्यू झाला, त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे. जखमी वारकरी भगिनींची रुग्णालयात जाऊन भेट घेतली असून त्यांच्या उपचारात कोणतीही कमतरता राहणार नाही, याबाबत जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. पंढरीच्या वाटेवर निघालेल्या वारकऱ्यांची सुरक्षितता ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे सर्वांनी वाहन चालवताना चालणाऱ्या वारकऱ्याची काळजी घ्यावी. जखमी भगिनी लवकर बऱ्या व्हाव्यात, हीच विठ्ठल चरणी प्रार्थना.”दरम्यान, आमदार रोहित पवार यांनीही या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करत आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, “दिंडीतील वाहनानेच धडक दिल्याने जेजुरीजवळ तीन वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना अत्यंत वेदनादायी आणि दुःखद आहे. या दुर्घटनेत काही वारकरी जखमी झाले आहेत. जखमी वारकरी लवकर बरे व्हावेत, ही श्री विठुरायाच्या चरणी प्रार्थना! हा अपघात कसा झाला याची सखोल चौकशी व्हावी. तसेच पुन्हा अशी घटना घडू नये याची दक्षता घेऊन प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात. तसेच वारकऱ्यांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घ्यावी, ही विनंती.”