वारकऱ्यांना पुरणपोळीचा पाहुणचार!

कर्मभूमीत जन्मभूमीतील नात्याची ओढ कायम

    दिनांक :13-Jul-2026
Total Views |
वर्धा,
varkari अनाथांच्या जीवनात मायेचा दीप प्रज्वलित करणार्या पद्मशी डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ यांनी जपलेली हीच मानवतेची परंपरा आजही त्यांच्या संस्थेत जोपासली जात आहे. त्यांच्या जन्मभूमी असलेल्या वर्धा जिल्ह्यातून आळंदी ते पंढरपूर पायी वारी करणार्या तब्बल ३०० वैदर्भीय वारकर्यांचे सासवडजवळील कुंभारवळण येथील ममता बाल सदन (बालगृह) येथे पुरणपोळीच्या भोजनाने स्वागत करण्यात आले. माईंच्या विचारांची ही सेवा-परंपरा सलग २७ वर्षांपासून अखंड सुरू आहे.
 

varkari devotees welcomed with puran poli feast at mamata bal sadan near saswad 
पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण येथील संस्थेत वारकर्यांचा दोन दिवस मुक्काम होता. पद्मशी डॉ. सिंधुताई सपकाळ यांचे पहिले मानसपुत्र तथा ममता बाल सदनचे अध्यक्ष दीपक गायकवाड, ममता सपकाळ, सुजाता गायकवाड, अधिक्षक स्मिता पानसरे यांनी वारकर्यांचे स्वागत केले. रविवार १२ रोजी वारकर्यांसाठी वैदर्भीय परंपरेनुसार पुरणपोळी, चपाती, पातोडीची भाजी, कढी, पालक व कांदा भजी, वरण-भात, सलाड अशा रुचकर भोजनाची व्यवस्था करण्यात आली. रात्री काल्याचे कीर्तन, हरिपाठ रंगला. आज सोमवार १३ रोजी सकाळी ८ वाजता ज्ञानोबा-तुकारामच्या जयघोषात ही दिंडी जेजुरीमार्गे पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली. यावेळी आश्रमातील मुलींनी पावली, फुगडी आणि अभंगांच्या गजरात वारकर्यांना निरोप दिला.
पद्मशी डॉ. सिंधुताई सपकाळ या मूळच्या वर्धा जिल्ह्यातील, तर त्यांची कर्मभूमी पुणे जिल्हा होती. त्यामुळे आपल्या माहेरच्या भूमीतून येणार्या वारकर्यांचा सन्मानपूर्वक पाहुणचार करण्याची परंपरा त्यांनी स्वतः सुरू केली होती. त्यांच्या निधनानंतरही ती सेवा त्यांचे पहिले मानसपुत्र तथा ममता बाल सदनचे अध्यक्ष दीपक गायकवाड यांनी पुढे चालविली आहे.
 
 
वर्धा जिल्ह्यातील दिंडी क्रमांक २१७ मधील जवळपास ३०० वारकरी मागील २७ वर्षांपासून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होत आहेत. संत ज्ञानेश्वर माउली पायदळ वारकरी दिंडी मंडळ वर्धा यांच्या वतीने दिंडी मालक कवडू महाराज कठाने आणि दिंडी चालक लक्ष्मण महाराज तराळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे. संस्थेच्या वतीने दिंडी मालक हभप कवडू कठाने यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला.
 
 
माईंच्या विचारांची ज्योत अधिक तेजस्वी व्हावी
पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांनी १९९३ मध्ये ममता बाल सदन (बालगृह) या संस्थेची स्थापना केली. तेव्हापासून म्हणजे २७ वर्षांपासुन वर्धा जिल्ह्यातील वारकरी दिंडीचा मुक्काम या संस्थेत असतो. माईंच्या हातून सुरू झालेली ही माणुसकीची परंपरा अखंड सुरू ठेवणे, हेच आमचे कर्तव्य आहे. समाजानेही या सेवायज्ञात सहभागी होऊन माईंच्या विचारांची ज्योत अधिक तेजस्वी करावी, अशी अपेक्षा मानसपुत्र गायकवाड यांनी व्यक्त केली.