वर्धा,
wardha health amrut mahotsav मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनानिमित्त गेल्यावर्षी वर्धा जिल्ह्यात मोतीबिंदू विरहित वर्धा अभियान राबविण्यात आले. यावर्षी सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी ‘आरोग्य अमृत महोत्सव’ राबविण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाने या अभियानाचे उत्तम नियोजन करावे. जास्तीत जास्त नागरिकांना अभियानाचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे, असे निर्देश पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्मदिन २२ ते २४ जुलैपर्यंत जिल्ह्यातील वर्धा, आर्वी, हिंगणघाट, देवळी येथे आरोग्य अमृत महोत्सवांतर्गत प्रमाणात विशेष आरोग्य शिबिरे घेतली जाणार आहेत. त्याअनुषंगाने पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी तयारीचा आढावा घेतला. बैठकीला आ. अरुण लखानी, आ. राजेश बकाने, आ. सुमित वानखेडे, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, उपजिल्हाधिकारी श्रीपती मोरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुमंत वाघ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील बेले आदी उपस्थित होते.
गेल्यावर्षी राबविण्यात आलेल्या मोतीबिंदू विरहित वर्धा अभियानात तब्बल ६ हजार ५१५ रुग्णांवर डोळ्यांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यावर्षी संपुर्ण आरोग्य तपासणीचे अभियान राबविण्यात येत आहे. आरोग्य अमृत महोत्सवांतर्गत वर्धेतील बच्छराज सभागृह येथे २२ ते २४ दरम्यान आरोग्य शिबिर होईल. आर्वी येथे ३१ जुलै ते १ ऑगस्ट, हिंगणघाट येथे ८ व ९ ऑगस्ट तर देवळी येथे १३ व १४ ऑगस्ट रोजी आरोग्य शिबिर होईल.
तपासणीमध्ये गंभीर किंवा दुर्धर आजार आढळणार्या रुग्णांना पुढील उपचार देण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. भोयर यांनी दिले. गावागावांमध्ये आशा स्वयंसेवकांमार्फत अभियानाची जनजागृती करून जास्तीत जास्त नागरिकांना शिबिराचा लाभ मिळेल, असे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सर्व शिबिराच्या ठिकाणी विशेष रक्तदान शिबिरांचे देखील आयोजन करण्यात आले आहे. दिव्यांगांना विविध प्रकारच्या साहित्य वाटपासह आयुष्मान कार्ड नोंदणी, विविध आरोग्य शिबिरांचा थेट लाभ शिबिराच्या ठिकाणी देण्यात येणार आहे. तसेच गरजूंना चष्म्यांचे वाटप देखील केले जाणार आहे. यावेळी आ. लखानी, आ. बकाने, आ. वानखेडे यांनीही आरोग्य अमृत महोत्सवांतर्गत आयोजित आरोग्य शिबिराचे चांगले नियोजन करण्याच्या सूचना केल्या.