पुसद शहराची महत्वाकांक्षी पाणीपुरवठा योजना थंड बस्त्यात..!

    दिनांक :13-Jul-2026
Total Views |
निकृष्ट काम होत असल्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

पुसद, 
Water Supply Scheme महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाआभियान अंतर्गत 57 कोटी रुपये खर्चाची पुसद शहर पाणीपुरवठा योजना मंजूर झाली. जनतेच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या या योजनेचे कंत्राट थेट गुजरातच्या हीर कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले. तेही एस्टिमेटपेक्षा 8.89 टक्के जादा दराने..! या कंत्राटाबद्दल 68 अटी व शर्तींवर 4 मार्च 2024 रोजी करारनामा करण्यात आला. लगेच 7 मार्च 2024 रोजी ‘वर्क ऑर्डर’ देण्यात आली. गेल्या दोन वर्षांपासून या योजनेचे काम सुरू आहे. एकदा मुदत संपल्यानंतर पुढील आदेशापर्यंत मुदतवाढ देण्यात आली. पुढील आदेश केव्हापर्यंत याचा काहीही उल्लेख नवीन आदेशात नाही.
 
 
pani
 
गुजरात येथील कंत्राटदाराच्या निकृष्ट कामाबद्दल आणि होत असलेल्या दिरंगाईबद्दल माजी मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली आहे.
सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे 7 मे 2026 रोजी केलेल्या 11 पानांच्या सविस्तर तक्रारीवर या दोन्ही मान्यवरांनी तातडीने चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत, हे या ठिकाणी उल्लेखनीय. पुसद नगर परिषदेचे माजी विरोधी पक्षनेता निखिल चिद्दरवार यांनी नप मुख्याधिकारी किरण सुकलवाड यांनाही मुनगंटीवार यांचे हे पत्र दिले. परंतु त्यांनी अद्याप त्याची दखल घेतलेली नाही. पुसद नगर परिषदेत सध्या जनतेने निवडून दिलेले पदाधिकारी आहेत. त्यांच्याच आशीर्वादाने या महत्वाकांक्षी पाणीपुरवठा योजनेचे कंत्राट देण्यात आले. परंतु ‘सब कुछ गोल माल है’ अशी स्थिती असून जनता मात्र या योजनेचे शुद्ध पाणी केव्हा मिळणार याच्या प्रतीक्षेत आहे.