चेन्नई,
A storm of changes at CSK चेन्नई सुपर किंग्समध्ये मोठ्या बदलांची प्रक्रिया सुरू झाली असून, मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी तब्बल 18 वर्षांनंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या या निर्णयानंतर संघाच्या सपोर्ट स्टाफमध्येही मोठे फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गोलंदाजी प्रशिक्षक एरिक सिमन्स आणि फलंदाजी प्रशिक्षक माईक हसी यांच्या भवितव्याबाबतही विविध चर्चांना उधाण आले आहे. वृत्तानुसार, फ्लेमिंग यांच्या निर्गमनानंतर एरिक सिमन्स संघ सोडू शकतात, तर माईक हसी यांच्याबाबत अद्याप कोणताही अधिकृत निर्णय जाहीर झालेला नाही. चेन्नई सुपर किंग्स व्यवस्थापनाने फ्लेमिंग यांचा राजीनामा हा परस्पर संमतीने आणि सविस्तर चर्चेनंतर झालेला निर्णय असल्याचे स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे, काही आठवड्यांपूर्वीच संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन यांनी फ्लेमिंग पुढील हंगामातही मुख्य प्रशिक्षक राहतील, असे संकेत दिले होते. मात्र, त्यानंतर अचानक घडलेल्या घडामोडींमुळे हा निर्णय घेतल्याने क्रिकेट वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

स्टीफन फ्लेमिंग हे केवळ आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्सचेच नव्हे, तर मेजर लीग क्रिकेटमधील टेक्सास सुपर किंग्स आणि दक्षिण आफ्रिकेतील एसए20 स्पर्धेतील जोबर्ग सुपर किंग्स या संघांचेही प्रमुख प्रशिक्षक होते. मात्र, यंदाच्या हंगामात या दोन्ही स्पर्धांमध्ये अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे फ्रँचायझीने प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.मागील तीन आयपीएल हंगामांतील चेन्नई सुपर किंग्सची कामगिरीही समाधानकारक राहिली नाही. 2024, 2025 आणि 2026 या हंगामांत संघाने अनुक्रमे पाचवे, दहावे आणि आठवे स्थान मिळवले. या सातत्याने घसरलेल्या कामगिरीमुळे व्यवस्थापन नव्या नेतृत्वाच्या शोधात असल्याची चर्चा आहे. सीएसकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन यांनी फ्लेमिंग यांच्या योगदानाचे कौतुक करत, हा निर्णय दोन्ही बाजूंच्या सहमतीने झाल्याचे सांगितले. त्यांनी फ्लेमिंग यांचे संघासाठीचे योगदान कायम स्मरणात राहील, असेही नमूद केले. आता आगामी आयपीएल हंगामापूर्वी चेन्नई सुपर किंग्समध्ये केवळ खेळाडूंच्याच नव्हे, तर प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफच्या पातळीवरही मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.