श्रीनगर,
accident-during-a-cricket-match : जम्मू आणि काश्मीरमध्ये एका स्थानिक क्रिकेट स्पर्धेदरम्यान एक हृदयद्रावक घटना घडली. गोलंदाजी पूर्ण केल्यानंतर काही क्षणांतच एक खेळाडू अचानक मैदानावर कोसळला. त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. संपूर्ण मैदानावर शोककळा पसरली आणि सामना थांबवावा लागला. ही दुःखद घटना भालेसा चेनाब प्रीमियर लीगच्या (बीसीपीएल) तिसऱ्या हंगामादरम्यान घडली. मृत खेळाडूचे नाव सुहेल असून, तो बादशाह ११ भालेसा संघाकडून वायसीसी जिमखाना किश्तवारविरुद्ध खेळत होता.
एक षटक पूर्ण केल्यानंतर गोलंदाज मैदानावर कोसळला
प्रत्यक्षदर्शींच्या मते, सुहेलने नुकतेच त्याचे दुसरे षटक पूर्ण केले होते. षटक संपल्यानंतर तो आपल्या बुटांच्या लेस बांधण्यासाठी खाली वाकला. तो उभा राहताच, त्याला अस्वस्थ वाटू लागले आणि तो तोल सांभाळण्यासाठी धडपडत होता. काही सेकंद स्वतःला सावरल्यानंतर तो चालू लागला, पण अचानक मैदानावर कोसळला. हे पाहून त्याचे सहकारी खेळाडू आणि उपस्थित लोकांनी तात्काळ त्याच्या मदतीसाठी धाव घेतली.
त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अशीच एक घटना काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील संभाजी नगर जिल्ह्यात एका स्थानिक क्रिकेट सामन्यादरम्यान घडली होती. सामन्याच्या थेट प्रक्षेपणात सुहेलला रुग्णालयात घेऊन जाणारे एक वाहन मैदानात प्रवेश करताना दिसले होते. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण सध्या अज्ञात आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मृतदेह त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिला जाईल. सुहेलचे कुटुंब जम्मू आणि काश्मीरमधील डोडा जिल्ह्यातील भद्रवाह भागातील असल्याचे सांगितले जाते.
सामन्यातील शानदार कामगिरीनंतर अपघात घडला
अपघातापूर्वी सुहेल उत्कृष्ट गोलंदाजी करत होता. त्याने दोन षटकांत केवळ आठ धावा देऊन दोन बळी घेतले होते. प्रथम फलंदाजी करणाऱ्या त्याच्या संघाने १२ षटकांत १४७ धावा केल्या होत्या, ज्यात आदिल मीरने ३८ चेंडूंमध्ये ७५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती. त्यानंतर सुहेल लक्ष्य वाचवण्यासाठी मैदानात आला. गांडोह तहसीलच्या थलोरन येथील क्रीडा स्टेडियमवर सामना खेळला जात होता. या घटनेनंतर स्पर्धेच्या आयोजकांनी सामना तात्काळ थांबवला.