अडोळ नदी बनली कचराकुंडी

-नदीपात्रात घनकचर्‍याचा खच -दहा वर्षांत नदीची खोली १५ फुटांवरून आली थेट ७ फुटांवर!

    दिनांक :14-Jul-2026
Total Views |
मालेगाव,
adol river तालुक्यातील बोराळा जहागीर परिसरातील अडोळ (बोराळा) प्रकल्पाच्या जलसाठ्यावर रिसोड आणि शिरपूर या दोन्ही प्रमुख शहरांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. मात्र, सध्या या प्रकल्पाला पाणी पुरविणार्‍या मुख्य अडोळ नदीचे रूपांतर चक्क ‘कचराकुंडीत’ झाले आहे. नदीपात्रात मोठ्या प्रमाणात घनकचरा साचल्याने पाण्याच्या गुणवत्तेचा प्रश्न गंभीर बनला असून, दोन्ही शहरांतील हजारो नागरिकांच्या आरोग्याबाबत तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे.

अडोळ नदी बनली कचराकुंडी
अडोळ नदीचा मुख्य प्रवाह वाघी बु. गावातून जातो. मात्र, गेल्या काही काळापासून गावातील घनकचरा नदीकाठावर तसेच थेट नदीपात्रातच टाकला जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. प्लास्टिक, घरगुती ओला-सुका कचरा व अन्य टाकाऊ वस्तूंमुळे नदीचे पाणी कमालीचे दूषित होत आहे. हेच दूषित पाणी पुढे अडोळ प्रकल्पात संकलित होऊन तिथून रिसोड व शिरपूर शहरांना पुरविले जात असल्याने नागरिकांमधून प्रशासनाच्या उदासीनतेबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.
नदीचे पात्र झाले उथळ
नदीपात्रात केवळ कचराच नव्हे, तर मोठ्या प्रमाणात गाळही साचला आहे. नदीच्या दोन्ही काठांवर झुडपे आणि काटेरी बाभळींची अवाढव्य वाढ झाल्याने नदीची नैसर्गिक वहनक्षमता मोठ्या प्रमाणात घटली आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे दहा वर्षांपूर्वी या नदीपात्राची खोली साधारण १५ फूट होती.adol river मात्र, वर्षानुवर्षे साचत गेलेल्या गाळामुळे ही खोली आता केवळ सात ते आठ फुटांपर्यंतच मर्यादित राहिली आहे. पात्र उथळ झाल्यामुळे आगामी पावसाळ्यात नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.
नदीचे पुनरुज्जीवन करा
अडोळ नदीपात्रातील घनकचरा तातडीने हटवून तिथे व्यापक स्वच्छता मोहीम राबवावी, तसेच साचलेला गाळ काढून नदीचे पुनरुज्जीवन करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे. यासोबतच, भविष्यात नदीपात्रात किंवा नदीकाठावर कचरा टाकून प्रदूषण करणार्‍यांवर कठोर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी जोर धरत आहे.