तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली,
ashwini-vaishnaw : रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी भारतीय रेल्वेत दुसऱ्या टप्प्यात करण्यात येणाऱ्या ८ सुधारणांची घोषणा केली. भारतीय रेल्वेचा कारभार अत्याधूनिक, अधिक पारदर्शी करण्यासाठी तसेच कार्यक्षमता आणि उत्पादकता वाढवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाने वर्षभरात ५२ सुधारणांचा महत्वाकांक्षी कार्यक्रम रेल्वने जाहीर केला आहे, पहिल्या टप्प्यात ९ सुधारणांची घोषणा करण्यात आली होती.
मंगळवारी एका पत्रपरिषदेत वैष्णव यांनी दुसऱ्या टप्प्यातील आठ सुधारणांची घोषणा केली. देशाच्या बांधकाम क्षेत्रात दरवर्षी ९६ दशलक्ष टन कोळशाच्या राखेचा वापर केला जातो, ही राख सिमेंट उद्योगात वापरली जाते, याकडे लक्ष वेधत वैष्णव म्हणाले की, या राखेची वाहतूक आतापर्यंत उघड्या वॅगनमधून केली जात होती, त्यामुळे मोठ्या प्रमाणात धुळ उडून प्रदूषणासह अन्य अनेक समस्या उदभवत होत्या, हा प्रकार टाळण्यासाठी यापुढे या राखेची वाहतूक कंटेनरमधून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
देशात खत आणि रसायनांची ८५ टक्के वाहतूक रेल्वेतून होते, यानंतर खतांची वाहतूकही कंटेनरमधून केली जाईल, असे स्पष्ट करत वैष्णव म्हणाले की, खतांच्या वाहतुकीचे दर ठरवण्यासाठी आतापर्यंत रेल्वे वेगवेगळे नियम होते, त्यामुळे घोळ होत होता. आतामात्र मालवाहतुकीचे भाडे प्रतिटन आणि प्रतिकिलोमीटर याप्रमाणे ठरवले जाणार आहे.
धान्य आणि डाळींची वाहतूकही आता बंद कंटेनरमधून केली जाईल, असे स्पष्ट करत वैष्णव म्हणाले की, आतापर्यंत वॅगनमधून या धान्याची वाहतूक केली जात होती, त्यामुळे उंदीर आणि घुशीमुळे धान्याची मोठी नासाडी होत होती. आता बंद कंटेनरमधून धान्याची वाहतूक होणार असल्यामुळे ती सुरक्षित होणार आहे. या मालवाहुकीचे भाडेही प्रतिटन आणि प्रतिकिलोमीटर याप्रमाणे आकारले जाणार आहे.
मालवाहतुकीसाठी अलगअलग प्रकारचे कंटेनर वापरले जात असल्यामुळे कंपन्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता, त्यामुळे रेल्वे आता यासाठी एकीकृत परवाना पध्दत आणत आहे, त्यामुळे एकाच परवान्यावर काम चालेल, ही पध्द्त २० वर्ष लागू राहणार आहे, असे वैष्णव यांनी सांगितले. आतापर्यंत रेल्वेत वॅगन तयार करण्याचा अधिकार आरडीएसओ या रेल्वेच्या कंपनीचा होता, आता वेगवेगळ्या कंपन्यांना त्यांच्या उत्पादनाच्या वाहतुकीच्या सोयीनुसार वॅगन बनवण्याचा अधिकार दिला जाणार आहे, असे वैष्णव यांनी सांगितले.