पंढरपूर,
Ban on meat sales in Pandharpur आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये येणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या धार्मिक भावना लक्षात घेऊन प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १५ जुलैपासून २९ जुलैपर्यंत पंढरपूर शहर आणि परिसरात मांस व मटण विक्रीवर संपूर्ण बंदी लागू करण्यात आली आहे. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सूचनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. आषाढी एकादशीच्या काळात दररोज लाखो भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल होत असतात. या काळात शहरात मांस विक्री सुरू राहिल्यास भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात, या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. आदेशानुसार, १५ दिवसांच्या कालावधीत पंढरपूर शहर आणि आसपासच्या परिसरात कुठेही मांस किंवा मटणाची विक्री करता येणार नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, वारीसाठी येणाऱ्या भाविकांच्या प्रवासाची सोय अधिक सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने पंढरपूर आगाराला पाच नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बस उपलब्ध करून दिल्या आहेत. या बसचे लोकार्पण पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार समाधान आवताडे यांनी वारीदरम्यान वारकऱ्यांना सुरक्षित, दर्जेदार आणि सुलभ प्रवासाची सुविधा देणे हे प्रशासनाचे कर्तव्य असल्याचे सांगितले. तसेच यात्रेपूर्वी आणखी काही नवीन बस आगाराला मिळणार असल्याची माहिती देत, लाखो भाविकांच्या वाहतुकीसाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.