पुन्हा तुटला पाकिस्तान? बलूच म्हणाले आम्ही स्वतंत्र!

    दिनांक :14-Jul-2026
Total Views |
क्वेटा,
पाकिस्तानसमोर नवे राजकीय आणि सुरक्षा आव्हान उभे राहिल्याची चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आलेल्या एका निवेदनात बलुचिस्तानने स्वतःला 'बलुचिस्तान प्रजासत्ताक' या नावाने स्वतंत्र राष्ट्र घोषित केल्याचा दावा करण्यात आला आहे. या निवेदनानुसार, बलुचिस्तानमधील ८५ टक्के भूभागावर नियंत्रण मिळविल्याचा दावा करण्यात आला असून, स्वतंत्र ध्वज, राष्ट्रगीत, नवीन चलन आणि प्रशासकीय व्यवस्था लागू केल्याचेही नमूद करण्यात आले आहे.व्हायरल झालेल्या पत्रात नव्या प्रशासनाने प्रदेशातील खनिजसंपत्ती, नैसर्गिक वायू क्षेत्रे आणि कोळसा खाणींवर नियंत्रण प्रस्थापित केल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांमधील अनेक अधिकाऱ्यांनी बलुचिस्तानला पाठिंबा दर्शवत राजीनामे दिल्याचाही उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे.
 
 

Call for Balochistan 
 
 
आंतरराष्ट्रीय संस्थेकडून अद्याप स्वतंत्र मान्यता नाही
बलुचिस्तानमध्ये अनेक वर्षांपासून पाकिस्तानविरोधी भावना आणि आंदोलन सुरू आहेत. गेल्या काही काळात या प्रदेशात निदर्शने अधिक तीव्र झाली असून, आंदोलकांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर आणि पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या विरोधात घोषणाबाजी केली होती. या पार्श्वभूमीवर स्वतंत्र राष्ट्राच्या दाव्यामुळे पाकिस्तानसमोरील आव्हाने आणखी वाढल्याची चर्चा आहे.मात्र, या संपूर्ण प्रकरणातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या या पत्राला अद्याप कोणत्याही अधिकृत सरकारी संस्थेचा किंवा आंतरराष्ट्रीय संघटनेचा दुजोरा मिळालेला नाही. तसेच जगातील कोणत्याही मान्यताप्राप्त देशाने किंवा आंतरराष्ट्रीय संस्थेने बलुचिस्तानला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता दिलेली नाही.
 
 

Call for Balochistan 
 
 
दरम्यान, बलुचिस्तानमध्ये गेल्या काही महिन्यांपासून हिंसक घटनांमध्ये वाढ झाली आहे. वांशिक बलुच बंडखोर आणि तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) यांच्याकडून सुरक्षा दलांवर सातत्याने हल्ले होत आहेत. पाकिस्तानच्या लष्कर, फ्रंटियर कॉर्प्स (एफसी) आणि बलुचिस्तान पोलिसांनी संयुक्तपणे राबविलेल्या 'ऑपरेशन शाबान'मध्ये ५ जुलैपासून आतापर्यंत १०९ दहशतवादी ठार झाल्याचा दावा करण्यात आला असून, त्यापैकी ७१ जण या संयुक्त कारवाईत मारले गेल्याचे पाकिस्तानकडून सांगण्यात आले आहे. अशा परिस्थितीत बलुचिस्तानमधील घडामोडींवर जगाचे लक्ष लागले असून, स्वतंत्र राष्ट्राच्या दाव्याबाबत अधिकृत स्पष्टतेची प्रतीक्षा कायम आहे.