नवी दिल्ली,
cross border terrorist attack सीमापार दहशतवादी हल्ले अस्वीकारार्ह असून, भारताला याविरोधात कारवाई करण्याचा पूर्ण अधिकार आहे. दहशतवादाविरोधात शून्य सहिष्णुतेचे धोरण योग्य आहे आणि पाकिस्तान परस्कृत दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी योग्य ती पावले उचलायला हवी असे स्पष्ट करत पोलंडचे उपपरराष्ट्र मंत्री व्लादिस्लाव तेओफिल बार्टोशेव्स्की यांनी भारताला पाठिंबा दर्शवला आहे. सीमापार दहशतवादाच्या मुद्द्यावर युरोपीय देश पोलंडकडून भारताला पाठिंबा मिळाला आहे.
सीमापार दहशतवादाबद्दल भारताने व्यक्त केलेल्या चिंतेला उत्तर देताना, पोलंडचे उपपरराष्ट्र यांनी सांगितले की, भारताचे सर्व प्रकारच्या दहशतवादाविरोधात असलेले शून्य सहिष्णुतेचे धोरण योग्य आहे. भारतीय भूभागावरील दहशतवादी हल्ले कोणत्याही परिस्थितीत अस्वीकार्य असल्याचे व्लादिस्लाव वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. त्यांनी सांगितले की, पोलंड स्वतः रशियाकडून होणाऱ्या जाळपोळ, घातपात, सायबर हल्ले आणि हत्यांच्या घटनांचा सामना करत आहे आणि हा राज्य पुरस्कृत दहशतवाद आहे. रशियाकडून होणाऱ्या अशा हल्ल्यांबाबत आमची शून्य सहनशीलता आहे. फेब्रुवारीमध्ये माझ्या भारत दौऱ्यादरम्यान या विषयावर माझी जयशंकर यांच्याशी प्रदीर्घ चर्चा झाली होती.
द्विपक्षीय भागीदारी आणखी बळकट
पोलंडच्या पाकिस्तानसोबतच्या संबंधांविषयी विचारलेल्या प्रश्नावर व्लादिस्लाव म्हणाले की, याचा भारताच्या हितावर परिणाम होणार नाही. दोन्ही देशांमधील वारंवार होणाऱ्या उच्चस्तरीय बैठका हे सिद्ध करतात की पोलंड भारतासोबतच्या आपल्या संबंधांना खूप महत्त्व देतो. पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील. पोलंडचे परराष्ट्र मंत्री राडोस्लाव आणि जयशंकर नियमित संपर्कात असतात. यामुळे दोन्ही देशांमधील सामरिक भागीदारी आणखी मजबूत होते.