गोमातेला ‘राष्ट्रीय आधार’ घोषित करा : आचार्य त्र्यंबकगिरी महाराज

गोसंवर्धनासाठी देशव्यापी जनजागृतीची गरज

    दिनांक :14-Jul-2026
Total Views |
वाशीम, 
acharya tryambakgiri maharaj धनामुळे केवळ भौतिक सुखसुविधा मिळू शकतात; परंतु खरा आनंद आणि समृद्ध जीवनासाठी उत्तम आरोग्य आवश्यक आहे. भारतीय गोसंस्कृती ही आरोग्यदायी जीवनशैलीचा महत्त्वाचा आधार असून, गोमातेच्या संवर्धनासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत. गोमातेला राष्ट्रीय माता घोषित करण्याबाबत अडचणी असतील, तर किमान ‘राष्ट्रीय आधार’ म्हणून घोषित करावे, अशी मागणी आचार्य त्र्यंबकगिरी महाराज यांनी केली.
 

acharya tryambakgiri maharaj 
 
 
स्थानिक महेश भवन येथे माहेश्वरी वाशीम जिल्हा सभा व माहेश्वरी समाजाच्या वतीने आयोजित चिंतन बैठकीत ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. आचार्य त्र्यंबकगिरी महाराज म्हणाले की, समाजहिताच्या अनेक मागण्या शासनापर्यंत पोहोचत नाहीत. समाजसेवेची इच्छा असणार्‍यांकडे आर्थिक साधने नसतात, तर आर्थिकदृष्टया सक्षम असणार्‍यांचे समाजकारणाकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येते. सनातन धर्माच्या नावाखाली वाढत चाललेल्या व्यापारीकरणावर त्यांनी चिंता व्यक्त करत संत, संन्यासी आणि धार्मिक संस्थांनी साधेपणा, पारदर्शकता व सेवाभाव जपण्याची गरज अधोरेखित केली. मंदिरांमध्ये भक्तांकडून पैशाची सक्तीने मागणी होणे, धार्मिक क्षेत्रातील गैरप्रकार तसेच अलीकडील मंदिरांमधील चोरीच्या घटनांमुळे समाजात चुकीचा संदेश जात असल्याचे त्यांनी नमूद केले. धर्माचा खरा उद्देश समाजसेवा, नैतिकता आणि मानवकल्याण असून, गरजूंना मदत करणे हाच सर्वोच्च धर्म असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गोसंवर्धनाच्या विषयावर बोलताना त्यांनी सांगितले की, गायीचे शेण, गोमूत्र आणि दूध यांचे पारंपरिक उपयोग भारतीय संस्कृतीत महत्त्वाचे मानले गेले आहेत. ग्रामीण भागात प्रत्येक शेतकर्‍याने शक्य असल्यास किमान एक गाईचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले. देशभर सुरू असलेल्या गो जनजागृती स्वाक्षरी अभियानात सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे, असेही त्यांनी सांगितले. या अभियानांतर्गत विविध जिल्ह्यांमधून खासदारांमार्फत निवेदने देण्यात येत असून, अखेरीस कोट्यवधी स्वाक्षर्‍यांसह पंतप्रधान कार्यालयात निवेदन सादर करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
वृद्धाश्रमांच्या वाढत्या संख्येबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली. वृद्धांना कुटुंबापासून दूर ठेवण्यापेक्षा त्यांचे समुपदेशन करून पुन्हा कुटुंबात सन्मानाने स्थान मिळवून देणे हीच खरी सेवा असल्याचे त्यांनी सांगितले. लोकसंख्या नियंत्रणाबाबतही त्यांनी सर्व समाजघटकांसाठी समान कायद्याची आवश्यकता व्यक्त केली.acharya tryambakgiri maharaj देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि संसाधनांचे योग्य नियोजन करण्यासाठी लोकसंख्या नियंत्रणाचा प्रभावी कायदा आवश्यक असल्याचे त्यांनी मत व्यक्त केले. यावेळी माहेश्वरी वाशीम जिल्हा सभेच्या वतीने जिल्हाध्यक्ष सुनील गट्टानी, प्रदेश सदस्य निलेश सोमानी, ज्येष्ठ समाजसेवक रमेश लड्डा, माजी जिल्हाध्यक्ष कैलाश मुंदडा, अतुल चांडक आणि डॉ. पंकज दागडिया यांच्या हस्ते आचार्य त्र्यंबकगिरी महाराज यांचा महेश दुपट्टा व शाल देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलेश सोमानी यांनी केले. संचालन कैलास मुंदडा यांनी केले. तर आभार जिल्हाध्यक्ष सुनील गट्टानी यांनी मानले.