चीनमध्ये जलप्रलय;20 लाखांहून अधिक नागरिकांचे स्थलांतर

    दिनांक :14-Jul-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Devastating floods in China 'बावी' चक्रीवादळामुळे चीनमध्ये अभूतपूर्व संकट निर्माण झाले असून, देशातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस, पूर आणि वादळी वाऱ्यांमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीचा सर्वाधिक फटका झेजियांग प्रांताला बसला असून, तेथून 20 लाखांहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.पूरामुळे अनेक शहरांतील रस्ते तब्बल दोन मीटरपर्यंत पाण्याखाली गेले आहेत. वेगवान पाण्याच्या प्रवाहात वाहने वाहून जात असल्याचे अनेक व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहेत. यावर्षी चीनला धडकलेले 'बावी' हे सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ मानले जात असून, पूर्व चीनमध्ये त्याने मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.
 
 
babi
 
झेजियांग प्रांतातील किनारपट्टीवरील युएकिंग शहरात 1,300 हून अधिक झाडे कोसळली असून, त्यापैकी जवळपास 700 झाडे मुळासकट उन्मळून पडल्याची माहिती समोर आली आहे. तसेच देशातील 46 नद्यांमधील पाण्याची पातळी धोक्याच्या मर्यादेपेक्षा वर गेल्याने पूरस्थिती अधिक गंभीर झाली आहे.चक्रीवादळामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अनेक भागांतील शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. विमान आणि रेल्वे सेवा रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले आहेत. 13 दिवसांपूर्वी पॅसिफिक महासागरात तयार झालेले 'बावी' हे यंदाच्या वर्षातील आशिया-पॅसिफिक प्रदेशातील सर्वाधिक काळ टिकलेले उष्णकटिबंधीय चक्रीवादळ ठरले आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, 'बावी' आता उष्णकटिबंधीय वादळात रूपांतरित होऊन काहीसे कमकुवत झाले असले तरी ते कोरियन द्वीपकल्पाच्या दिशेने सरकत आहे. या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात साचलेली आर्द्रता बाहेर पडणार असल्याने त्या भागात आणखी मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.