गोंदण आणि टॅट्यूचे दुष्परिणाम

    दिनांक :14-Jul-2026
Total Views |
वेध...
नितीन शिरसाट
effects of tattoo शरीराच्या त्वचेवर काेरलेले गोंदण हा केवळ शरीरावरील अलंकार नसून मानवी संस्कृतीचा, सामाजिक रचनेचा, धार्मिक विश्वासाचा जिवंत दस्तऐवज आहे. मानववंशशास्त्राच्या दृष्टीने पाहिले तर गोंदण ही एक शारीरिक भाषा आहे. माणूस बोलण्याआधी चिन्हे वापरत होता त्यापैकी एक म्हणजे शरीरावर कायमस्वरूपी कोरलेले नक्षीकाम. भारतात सिंधू संस्कृतीतील मूर्तींवर, प्राचीन शिल्पांवर लोकपरंपरांमध्ये शरीरालंकरणाचे अनेक पुरावे आढळतात. जरी टॅट्यूचे थेट पुरावे मर्यादित असले, तरी लोकसंस्कृतीत गोंदणाला हजारो वर्षांची परंपरा लाभली आहे. शरीरावरील प्रत्येक चिन्ह काही ना काही संदेश देत असे. उदाहरणार्थ व्यक्ती कोणत्या जमातीची आहे. तिचे वैवाहिक स्थान काय आहे वगैरे. भारतातील गोंदण परंपरा सर्वाधिक आदिवासी समाजात आढळते. गोंड समाजामध्ये गोंदण हे सौंदर्य, धार्मिक श्रद्धा आणि सामाजिक प्रतिष्ठेचे प्रतीक होते. स्त्रिया हात, पाय, मान, कपाळावर विशिष्ट भूमितीय नक्षी गोंदवत.
 
 
tatoo
 
बंजारा महिलांच्या गोंदणात मोर, फुले, वेली, सूर्य, चंद्र आणि धार्मिक प्रतीकांचा वापर होत असे. महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेशातील भील समाजात गोंदणाला संरक्षणात्मक धार्मिक महत्त्व होते. काही चिन्हे वाईट शक्तींपासून रक्षण करतात, अशी श्रद्धा होती. महाराष्ट्रातील गोंड, कोरकू, धनगर, कोळी, ठाकूर, बंजारा आणि इतर समाजांमध्ये गोंदणाला विशेष स्थान होते. जत्रा, यात्रा धार्मिक उत्सवांमध्ये गोंदण करणाऱ्या स्त्रिया गावोगावी फिरत असत. राम, विठ्ठल, ओम, त्रिशूळ, स्वस्तिक, देवीची पावले अशी चिन्हे हातावर किंवा दंडावर गोंदवली जात. अनेक भागांत मुलीच्या विवाहापूर्वी गोंदण करणे ही सामाजिक प्रथा मानली जात असे. पंढरपूर, जेजुरी, माहूर, तुळजापूर, शेगाव, अंबाबाई, खंडोबा, संतांच्या यात्रांमध्ये गोंदण करणारे कारागीर मोठ्या संख्येने येतात. आधुनिकीकरणामुळे बदललेली परंपरा गेल्या चार दशकांत गोंदण परंपरेत मोठा बदल झाला आहे. शहरीकरण, आधुनिक फॅशन वाढल्याने पारंपरिक गोंदण कमी झाले. त्याची जागा आधुनिक टॅट्यूंनी घेतली. धार्मिक प्रतीकांच्या जागी इंग्रजी अक्षरे, पोर्ट्रेट, आधुनिक कलात्मक डिझाईन रंगीत टॅट्यू लोकप्रिय झाले. आजच्या तरुणाईमध्ये टॅट्यू म्हणजे केवळ फॅशन नसून ती व्यक्तिमत्त्वाची ओळख झाली आहे. हात, मान, छाती, पाठ, मनगट, पाय अशा शरीराच्या विविध भागांवर कायमस्वरूपी किंवा तात्पुरते टॅट्यू काढण्याची स्पर्धाच दिसून येते. सोशल मीडियावर सेलिब्रिटी, खेळाडूंच्या प्रभावामुळे टॅट्यूचे आकर्षण आणखी वाढले आहे.
 
 
effects of tattoo  टॅट्यू शाईतील रासायनिक विज्ञान गुंतागुंतीचे आहे. टॅट्यूची शाई म्हणजे साधा रंग नसतो. ती रंगद्रव्ये रासायनिक मिश्रणांनी तयार केलेली असते. त्वचेच्या थरात ही शाई आयुष्यभर राहते, त्यामुळे तिच्या गुणवत्तेला, रासायनिक रचनेला विशेष महत्त्व आहे. आधुनिक टॅट्यू उद्योगाला १९७० नंतर पाश्चिमात्य देशांमध्ये टॅट्यूला नवीन ओळख मिळाली. संगीत, चित्रपट, खेळ आणि फॅशन उद्योगातील प्रसिद्ध व्यक्तींनी टॅट्यू स्वीकारल्यानंतर त्याची लोकप्रियता वाढत गेली. भारतामध्ये १९९० नंतर इंटरनेट व सोशल मीडियाच्या युगात टॅट्यू स्टुडिओंची संख्या झपाट्याने वाढली. आज महानगरांपासून शहरांपर्यंत आधुनिक टॅट्यू स्टुडिओ उपलब्ध आहेत. टॅट्यू उद्योगाची आर्थिक उलाढाल कोटी रुपयांचा जागतिक उद्योग बनला आहे. टॅट्यू मशीन, सुया, रंग, त्वचा-देखभाल उत्पादने, प्रशिक्षण संस्था, डिझाईन सॉफ्टवेअर, लेझर रिमूव्हल केंद्रे, ऑनलाईन डिझाईन प्लॅटफॉर्म यामुळे संपूर्ण उद्योग साखळी निर्माण झाली आहे. भारतातही प्रशिक्षित टॅट्यू कलाकार, डिजिटल डिझाईन, आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टुडिओ विशेष प्रशिक्षण अभ्यासक्रम उपलब्ध झाले आहेत. नवीन संशोधनानुसार शरीरावर गोंदवून घेतल्याने आरोग्य तज्ज्ञांच्या मते टॅट्यू काढण्याचा विचार करणाऱ्या प्रत्येकाला स्वच्छता आणि शाईमधील घटकांविषयी टॅट्यू काढणाऱ्यांशी बोलण्याचा सल्ला देतात, ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत आहे. त्यांनी टॅट्यू काढण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, अशी शिफारस तज्ज्ञ करतात. सध्या माणसांमध्ये टॅट्यू आणि कर्करोग यांचा संबंध जोडणारा कोणताही निश्चित पुरावा नसला, तरी काही अभ्यासकांनी टॅट्यू काढलेल्या व्यक्तीमध्ये त्वचेच्या कर्करोगाचा धोका जास्त असल्याचे दाखविले आहे. याचबरोबर बेकायदेशीर, अप्रमाणित स्वस्त दरात टॅट्यू करणाऱ्यांची संख्याही वाढली आहे, ही चिंतेची बाब आहे. शास्त्रज्ञांनी टॅट्यू मानवी शरीरावर कायमस्वरूपी गंभीर परिणाम करतात, असा इशारा दिला आहे.
 
९८८१७१७८२८