जीवाची पर्वा न करता पोलिसांनी वाचवले दोन वृद्धांचे प्राण

    दिनांक :14-Jul-2026
Total Views |
- एसीला आग लागल्याने अपार्टमेंटला लागली आग

अनिल कांबळे
नागपूर, 
Fire in the apartment धंतोली परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये एअर कंडिशनर (एसी)ला आग लागून संपूर्ण फ्लॅटमध्ये धूर झाला. त्यामुळे चार कुटुंबियांनी लगबगीने इमारतीखाली धाव घेतली. मात्र, दोन ज्येष्ठ नागरिक फ्लॅटमध्ये अडकले. दोघांनाही अर्धांगवायू असल्यामुळे हालचाल करता येत नव्हती. धंतोलीच्या तीन पोलिस कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता आणि वेळेवर केलेल्या बचावकार्यात दोन्ही वृद्धांचे प्राण वाचवले. या कार्यामुळे धंतोली पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. धंतोली पोलिसांच्या धाडसी निर्णयाचे सर्वत्र कौतूक होत असून पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनीही या कार्याची दखल घेतली आहे.

aag
 
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारच्या सुमारास धंतोली येथील निम्स रुग्णालयाजवळ असलेल्या नेहाज्योत अपार्टमेंटमधील चौथ्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक ४०१ मध्ये एअर कंडिशनरला अचानक आग लागली. आग लागल्यानंतर काही क्षणांतच संपूर्ण फ्लॅट दाट धुराने भरून गेला. घटनेची माहिती मिळताच इमारतीतील रहिवाशांनी तत्काळ फ्लॅटचा वीजपुरवठा बंद केला. आग लागल्यानंतर वासनिक कुटुंबातील सदस्यांनी जिन्याच्या मार्गाने बाहेर पडून स्वतःचा बचाव केला. मात्र, ८२ वर्षीय तुळशीराम वासनिक आणि रुख्मीनी बक्षाणी हे आजारी असल्याने अंथरुणाला खिळले होते. त्यामुळे त्यांना बाहेर पडणे शक्य झाले नाही आणि ते फ्लॅटमध्येच अडकून पडले. घटनेची माहिती मिळताच धंतोलीचे ठाणेदार साईनाथ रामोड हे पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता पोलिस कर्मचारी उत्तम सरकटे, वृषभ नसीबकर आणि विक्की बोहरे यांनी फ्लॅटमध्ये प्रवेश केला आणि दोन्ही ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यानंतर त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
 
 
दरम्यान, अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली. प्राथमिक तपासात एअर कंडिशनरमध्ये बिघाड झाल्यामुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून, पुढील तपास सुरू आहे. या प्रसंगात धंतोली पोलिसांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे आणि धाडसामुळे मोठी दुर्घटना टळली असून, त्यांच्या तत्पर कारवाईचे परिसरातील नागरिकांनी कौतुक केले.