वॉशिंग्टन,
Former football referee passes away फुटबॉल विश्वावर पुन्हा एकदा शोककळा पसरली आहे. दक्षिण आफ्रिकेचा 25 वर्षीय मिडफिल्डर जेडन ॲडम्स यांच्या निधनाच्या धक्क्यातून फुटबॉल चाहते सावरत नाहीत, तोच आता नेदरलँड्सचे रेफरी रॉब डीपरिंक यांचे वयाच्या 38 व्या वर्षी अचानक निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. फिफा विश्वचषक 2026 साठी व्हिडिओ असिस्टंट रेफरी (VAR) म्हणून त्यांची निवड झाली होती. मात्र, स्पर्धा सुरू होण्याच्या सुमारे महिनाभर आधी त्यांना पथकातून वगळण्यात आले होते.रॉब डीपरिंक यांच्यावर एका अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणानंतर त्यांना विश्वचषकाच्या VAR पथकातून हटविण्यात आले. नंतर पुरेशा पुराव्याअभावी हे प्रकरण बंद करण्यात आले असले, तरी त्यांना विश्वचषकात काम करण्याची संधी मिळाली नव्हती.
डीपरिंक यांच्या निधनाचे नेमके कारण अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. नेदरलँड्स फुटबॉल असोसिएशनने अधिकृत निवेदनाद्वारे त्यांच्या निधनाची पुष्टी करत तीव्र शोक व्यक्त केला आहे. संघटनेने आपल्या निवेदनात रॉब डीपरिंक हे केवळ एक अनुभवी आणि आदरणीय रेफरी नव्हते, तर समर्पित आणि सहृदय सहकारीही होते, अशा शब्दांत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.फिफानेही त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करत डीपरिंक यांच्या कुटुंबीयांप्रती, मित्रपरिवाराप्रती आणि नेदरलँड्स फुटबॉल असोसिएशनप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. रॉब डीपरिंक 2017 पासून नेदरलँड्सच्या सर्वोच्च फुटबॉल लीग एरेडिव्हिझीमध्ये रेफरी म्हणून कार्यरत होते. युरो 2024 स्पर्धेतही त्यांनी VAR अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली होती. बीबीसीच्या वृत्तानुसार, फिफा विश्वचषक 2026 साठी VAR अधिकाऱ्यांच्या यादीत त्यांचे नाव होते. मात्र, लंडन मेट्रोपॉलिटन पोलिसांनी दाखल केलेल्या प्रकरणानंतर त्यांना पथकातून वगळण्यात आले होते. त्यानंतर पुराव्याअभावी तपास बंद झाला असला, तरी विश्वचषकातील त्यांची भूमिका कायम राहू शकली नाही.