इराणचे माजी राष्ट्राध्यक्ष अहमदीनेजाद नजरकैदेत

इस्रायलच्या संपर्कात असल्याचा आरोप; शत्रूसोबत हातमिळवणी केल्याचा आरोप

    दिनांक :14-Jul-2026
Total Views |
वॉशिंग्टन,
ahmadinejad under house arrest सत्तेत परत येण्यासाठी इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादच्या संपर्कात असल्याच्या आरोपात इराणचे माजी राष्ट्राध्यक्ष महमूद अहमदीनेजाद यांना आयआरजीसीने नजरकैदेत ठेवले आहे. अमेरिका व इस्रायल त्यांना पुन्हा सत्तेवर आणू इच्छित होते आणि अहमदीनेजाद यांनी त्यांच्यासोबत हातमिळवणी केली असा ठपका त्यांच्यावर ठेवला असल्याचा दावा अमेरिकन माध्यमांनी केला आहे.
 
 
ahmadinejad under house arrest
 
चार इराणी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने अमेरिकन माध्यमांनी दावा केला की, इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सच्या (आयआरजीसी) गुप्तचर शाखेने अहमदीनेजाद यांना ताब्यात घेऊन नजरकैदेत ठेवले आहे. इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. सध्याच्या इस्लामिक राजवटीच्या जागी अहमदीनेजाद यांना सत्तेवर आणण्याची इस्रायलची कथित योजना अयशस्वी झाल्यानंतर त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले. त्यांची प्रकृती ढासळली असून, उपचारही दिला जात नाही. दरम्यान २८ फेब्रुवारी रोजी सुरू झालेल्या इराणविरुद्ध अमेरिकेच्या ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ दरम्यान त्यांच्या निवासस्थानावर झालेल्या इस्रायली हवाई हल्ल्यानंतर, अहमदीनेजाद सार्वजनिक ठिकाणी दिसले नव्हते. हल्ल्यानंतर त्यांना एका सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले. कारवाईची शंका येऊ नये यासाठी गेल्या आठवड्यात त्यांना इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते, अयातुल्ला अली खामेनेई यांच्या अंत्यविधीच्या वेळी सार्वजनिकरित्या आणले गेले होते.
 
मोसादसोबत गुप्त संपर्क
अहवालानुसार, अहमदीनेजाद यांनी २०२३ मध्ये ग्वाटेमाला येथे झालेल्या एका पर्यावरण परिषदेदरम्यान इस्रायली गुप्तचर संस्था मोसादशी प्रथम संपर्क साधला होता. त्यानंतर, २०२४ मध्ये, त्यांना हंगेरीमधील लुडोविका युनिव्हर्सिटी ऑफ पब्लिक सर्व्हिस येथे आयोजित हवामान बदल परिषदेसाठी आमंत्रित करण्यात आले. विद्यापीठाचे रेक्टर, गेर्गेली डेली यांनी दावा केला की, अहमदीनेजाद आणि इस्रायली अधिकाऱ्यांची भेट घडवून आणण्यासाठी एका हंगेरियन सरकारी अधिकाऱ्याच्या विनंतीवरून हे आमंत्रण देण्यात आले होते.
माजी सल्लागाराने आरोप फेटाळले
तत्कालीन मोसाद प्रमुख डेव्हिड बार्निया हे देखील बुडापेस्ट येथील या कथित बैठकीत उपस्थित होते. अमेरिकन अधिकाऱ्यांनी दावा केला की, इस्रायलने अहमदीनेजाद यांच्या प्रवासाचा आणि निवासाचा काही खर्च देखील उचलला होता. तथापि, अहमदीनेजाद यांचे माजी सल्लागार अब्दोलरेझा दावरी यांनी अमेरिकन माध्यमांचे सर्व आरोप फेटाळले आहे. तथापि त्यांनी इराणमध्ये पुन्हा एकदा सत्तेच्या शिखरावर पोहोचणे हा त्यांचा उद्देश असल्याचे म्हटले आहे.