होर्मुझमध्ये क्षेपणास्त्र हल्ला; भारतीयाचा मृत्यू, आठ जण जखमी

    दिनांक :14-Jul-2026
Total Views |
तेहरान,
Indian killed in attack in Hormuz होर्मुझच्या सामुद्रधुनीत संयुक्त अरब अमिरातीच्या ध्वजाखालील दोन तेलवाहू टँकर्सवर झालेल्या इराणी क्रूझ क्षेपणास्त्र हल्ल्यात एका भारतीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी चार जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती संयुक्त अरब अमिरातीच्या संरक्षण मंत्रालयाने मंगळवारी दिली.संरक्षण मंत्रालयाने 'एक्स' या समाजमाध्यमावर प्रसिद्ध केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, ओमानच्या सागरी हद्दीतील होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या दक्षिण मार्गावरून प्रवास करणाऱ्या 'मोम्बासा' आणि 'बाहिया' या टँकर्सना लक्ष्य करण्यात आले. हल्ल्यानंतर दोन्ही जहाजांवर आग लागली होती. मात्र, बचाव पथकांनी तातडीने कारवाई करून आग पूर्णपणे विझवली.
 
 

546546 
 
या घटनेत 'मोम्बासा' टँकरवरील एका भारतीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. तसेच जखमी झालेल्या आठ जणांमध्ये सहा भारतीय आणि दोन युक्रेनियन नागरिकांचा समावेश असून, त्यापैकी चार जण गंभीर जखमी आहेत.या हल्ल्यानंतर संयुक्त अरब अमिरातीने तीव्र संताप व्यक्त करत त्याचा कठोर शब्दांत निषेध केला आहे. हा हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे गंभीर उल्लंघन असून त्यामुळे संपूर्ण प्रदेशाच्या सुरक्षिततेला आणि स्थैर्याला धोका निर्माण झाल्याचे यूएईने म्हटले आहे.
 
 
 
यूएई सरकारने आपल्या सार्वभौमत्वाचे, नागरिकांचे, रहिवाशांचे आणि राष्ट्रीय हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचा अधिकार राखून ठेवला असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच कोणत्याही संभाव्य धोक्याला तोंड देण्यासाठी देशाचे सशस्त्र दल उच्च सतर्कतेवर असल्याचेही संरक्षण मंत्रालयाने सांगितले. दरम्यान, इराणने या कारवाईचे समर्थन करत रिव्होल्यूशनरी गार्ड्सने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून कथितपणे बेकायदेशीरपणे प्रवास करणाऱ्या दोन जहाजांवर इशारा म्हणून गोळीबार केल्याचा दावा केला आहे. इराणच्या सरकारी दूरचित्रवाणीने दिलेल्या वृत्तानुसार, सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या या जलमार्गातून नियमांचे उल्लंघन करून प्रवास केल्याचा आरोप करत नौदलाने जहाजांना थांबवण्यासाठी ही कारवाई केली.