मुंबई,
Indrajaal trailer released रहस्य, सस्पेन्स आणि अनपेक्षित घटनांनी भरलेला आगामी हिंदी चित्रपट 'इंद्रजाल'चा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ट्रेलरमधील गूढ वातावरण, प्रभावी दृश्यरचना, दमदार संवाद आणि पार्श्वसंगीतामुळे चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे. सुमारे तीन मिनिटांचा हा ट्रेलर सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.ट्रेलरमध्ये प्रत्येक दृश्यामागे दडलेले रहस्य, कथानकातील अनपेक्षित वळणे आणि पात्रांभोवती उभे राहणारे गूढ वातावरण यामुळे 'इंद्रजाल' प्रेक्षकांना वेगळा सिनेमॅटिक अनुभव देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. चित्रपटाची भव्य निर्मिती, उत्कृष्ट छायांकन आणि प्रभावी तांत्रिक मांडणीही ट्रेलरमधून स्पष्टपणे दिसून येते.

'इंद्रजाल'चे दिग्दर्शन आणि संकलन जागेश्वर ललिता ढोबळे यांनी केले असून, निर्माती सुचेता अजय निकम आहेत. अजय शिवराम निकम आणि मंगेश शालीग्राम वैती यांनी सहनिर्मात्यांची जबाबदारी सांभाळली आहे. चित्रपटाची कथा आणि पटकथा नामदेव मुरकुटे यांनी लिहिली असून, छायांकन आकाश सेठी यांनी केले आहे.चित्रपटातील गाण्यांना सुवर्णा तिवारी आणि गौरव चाटी यांनी आवाज दिला आहे. संगीताची जबाबदारी गौरव चाटी यांनी सांभाळली असून, गीतलेखन योगेश दांगट यांनी केले आहे. पार्श्वसंगीत, संगीत संयोजन आणि प्रोग्रामिंगचे काम उदय साळवी यांनी केले आहे, तर हरेश सुतार यांनी क्रिएटिव्ह प्रोड्युसर म्हणून भूमिका बजावली आहे.
या चित्रपटात महेश निकम, शनाया त्रिपाठी, यशराज डिंबळे, नामदेव मुरकुटे, किरण माने, कल्पना सारंग, दर्शना रासाळ, धीरज शर्मा, सत्यम छेत्री, राहुल कुलकर्णी, जीवन वाघ, कल्पेश जगताप, योगेश दांगट, हेमंत पवार, शुभम चव्हाण, लक्ष्मी विभूते, संजना देशमुख, राहुल निकम, प्रतिक्षा सादाकाळे, दीपक देशमुख, वज्र पवार, मल्हार गुरव, अथर्व गाडे, कीर्ती बोडस, अजिम पटेल, ओंकार राऊत आणि विजय इंगळे यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. 'इंद्रजाल' हा चित्रपट 24 जुलै रोजी प्रदर्शित होणार असून, ट्रेलरनंतर चित्रपटाबाबतची उत्सुकता अधिक वाढली आहे. आता मोठ्या पडद्यावर या रहस्यमय कथेत कोणते धक्कादायक ट्विस्ट उलगडणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.