पुणे,
Ketan's mother appeal to Modi पुण्यातील तरुण उद्योजक केतन अग्रवाल यांच्या हत्येनंतर त्यांच्या आई राखी अग्रवाल यांनी न्यायासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भावनिक ई-मेल पाठवला आहे. या ई-मेलमधून त्यांनी मुलाच्या हत्येचा निष्पक्ष आणि जलद तपास व्हावा तसेच दोषींना कायद्यानुसार कठोर शिक्षा मिळावी, अशी मागणी केली आहे.राखी अग्रवाल यांनी आपल्या पत्रात एका आईची असह्य वेदना व्यक्त केली आहे. प्रत्येक पालकाचे स्वप्न आपल्या मुलाचे उज्ज्वल भविष्य पाहण्याचे असते, मात्र स्वतःच्या मुलावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ येईल, असे कधीही वाटले नव्हते, असे त्यांनी नमूद केले आहे. केतनच्या निधनानंतर घरातील प्रत्येक कोपरा त्याच्या आठवणींनी भरून गेला असून, कुटुंब अजूनही या धक्क्यातून सावरू शकलेले नसल्याचे त्यांनी सांगितले.
ई-मेलमध्ये त्यांनी आणखी एक दुःखद बाब मांडली आहे. केतनच्या मृत्यूचा धक्का त्याच्या आजोबांना सहन झाला नाही आणि काही दिवसांतच त्यांचेही निधन झाले. त्यामुळे अल्पावधीतच कुटुंबाने दोन पिढ्या गमावल्याची वेदना त्यांनी व्यक्त केली. राखी अग्रवाल यांनी पंतप्रधानांकडे कोणतीही विशेष सवलत किंवा सहानुभूती न मागता, केवळ न्यायाची अपेक्षा व्यक्त केली आहे. केतन हा केवळ एक गुन्ह्यातील पीडित नव्हता, तर तो आमच्या कुटुंबाचा आधार होता. हा खटला केवळ कागदपत्रांपुरता मर्यादित राहू नये, अशी विनंती त्यांनी केली आहे. दररोज मुलाच्या छायाचित्रासमोर उभे राहून त्याला न्याय मिळावा, अशीच प्रार्थना करत असल्याचेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे. या प्रकरणातील तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया विनाकारण लांबू नये, दोषींना शक्य तितक्या लवकर कठोर शिक्षा व्हावी आणि आपल्या मुलाला न्याय मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे हस्तक्षेपाची मागणी केली आहे.