लाखनीच्या पाणीप्रश्नावर मोठा दिलासा!

₹34.61 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला मंजुरी; 12 महिन्यांत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

    दिनांक :14-Jul-2026
Total Views |
लाखनी,
parinay-fuke : लाखनी शहरातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. शहरातील पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी अमृत 2.0 अभियानांतर्गत तयार करण्यात आलेल्या ₹34.61 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला महाराष्ट्र शासनाने प्रशासकीय मंजुरी दिली आहे. या योजनेसाठी विधान परिषदेचे सदस्य डॉ. परिणय फुके यांनी राज्य शासन आणि नगरविकास विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले आहे.
 
 

fuke 
 
 
या योजनेअंतर्गत शहरासाठी नवीन जलस्रोत विकसित करण्यात येणार आहेत. तसेच जलशुद्धीकरण केंद्र उभारले जाणार असून, उंच पाण्याच्या टाक्या (ईएसआर), नवीन जलवाहिन्या, पाणी वितरण व्यवस्था आणि अत्याधुनिक एससीएडीए (SCADA) प्रणालीही बसविण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात लाखनी शहरातील नागरिकांना अधिक शुद्ध, सुरक्षित आणि नियमित पाणीपुरवठा मिळण्यास मदत होणार आहे.
 
या प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून ₹17.30 कोटी, राज्य शासनाकडून ₹15.57 कोटी आणि लाखनी नगरपंचायतीकडून ₹1.73 कोटी असा निधी उपलब्ध होणार आहे. शासनाने हा प्रकल्प 12 महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.
 
योजनेला मंजुरी मिळाल्यानंतर प्रतिक्रिया देताना डॉ. परिणय फुके यांनी सांगितले की, लाखनीकरांना कायमस्वरूपी आणि दर्जेदार पाणीपुरवठा मिळावा, ही त्यांची सातत्याची भूमिका होती. या महत्त्वाच्या योजनेला मंजुरी दिल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य शासनाचे आभार मानले. तसेच ही योजना वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावी, यासाठीही आपण सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 
या योजनेमुळे लाखनी शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेत मोठी सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून, शहराच्या विकासालाही यामुळे नवी गती मिळणार आहे.