वृद्धाच्या हत्याकांडात निर्दोष युवकाला अटक

    दिनांक :14-Jul-2026
Total Views |
- गुन्हे शाखा पथकाचा प्रताप : पोलिस आयुक्तांनी घ्यावी दखल


अनिल कांबळे
नागपूर, 
Mankapur murder case मानकापूर परिसरातील बांधकाम मिस्त्री मेहताबसिंग सोहनलाल चौधरी (४३) यांच्या हत्याकांडात गुन्हे शाखा पोलिसांनी निर्दोष असलेल्या रोहित हरिप्रसाद गौतम (२५) या युवकाला अटक केली. त्याला जबर मारहाण करीत खून केल्याची कबुली देण्यास बाध्य केले. एवढेच नव्हे तर तो युवक अद्यापही खुनी म्हणून मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त आहे. या घटनेची दखल पोलिस आयुक्तांनी घ्यावी आणि दोषी पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी निर्दोष युवकाच्या नातेवाईकांनी केल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर मानकापूर पोलिसांनी या खून प्रकरणातील खरा आरोपी सागर कुमरे (२८) याला अटक केली आहे.

mur dksedzk 
 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मेहताबसिंग चौधरी यांचा अज्ञात आरोपीने कुऱ्हाडीने वार करुन खून केला. सुरुवातीला गुन्हे शाखेच्या युनीट पाचच्या पथाकने संशयाच्या आधारे रोहित गौतमला ताब्यात घेतले होते. गुन्हे शाखेने त्याला जबर मारहाण केली. त्याच्याकडून खून केल्याची कबुलीही लिहून घेतली. त्यानंतर मोठा गाजावाजा करीत पोलिस निरीक्षक विनायक गोल्हे यांनी आरोपी अटक केल्याचे मिरवले. आरोपीला मानकापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. मात्र, मानकापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हरीश कालसेकर यांनी नियमानुसार अटक केली. मात्र, त्यांना आरोपी भलताच असल्याचा विश्वास होता. त्यांनी रोहितची विश्वासाने संवाद साधला. त्यांना हत्याकांडाचा आरोपी वेगळाच असल्याचे लक्षात आले. त्यांनी लगेच सीसीटीव्ही फुटेजनुसार आरोपीचा शोध घेणे सुरु केले. त्याने आपण हत्या केली नसल्याचे सांगितले. तांत्रिक आणि वैज्ञानिक तपासाच्या आधारे तपासाची दिशा बदलली आणि सागर कुमरे याच्यापर्यंत पोलिस पोहोचले. चौकशीत सागरने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर कुमरे हा मेहताब चौधरी यांच्या घराजवळील अंधाऱ्या ठिकाणी बसून वारंवार मद्यपान करत असे. मेहताब त्याला तेथून हाकलून लावत असल्याने त्याच्या मनात राग निर्माण झाला होता. त्याचाच बदला घेण्यासाठी संधी साधून त्याने मेहताब यांची हत्या केल्याची कबुली दिली.
फक्त संशयावरुन आरोपीला अटक
या प्रकरणाच्या सुरुवातीच्या तपासात मेहताब चौधरी हे त्यांच्या मुलीचे आणि रोहित गौतमची मैत्री होती. त्याला मेहताब यांचा विरोध होता. गुन्हे शाखेचे गोल्हे यांनी याच धाग्यावरुन निर्दोष युवकाला अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले होते. मात्र, पुढील सखोल तपासात ही संपूर्ण कथा चुकीची असल्याचे स्पष्ट झाले. निष्पक्ष तपास आणि वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी खरा आरोपी सागर कुमरे याला अटक केली.
रोहितचा दोषी कोण?
मेहताब यांच्या हत्याकांडात गुन्हे शाखेने चुकीचा अंदाज लावत एका निर्दोष युवकाला अटक केली. तो युवक वारंवार खून केला नसल्याचे सांगत होता. मात्र, पोलिसांच्या मारहाणीमुळे शेवटी त्याने खून केल्याची कबुली दिली. गुन्हे शाखेने कोणताही ठोस पुरावा नसतानाही एका निर्दोष युवकाविरुद्ध हत्याकांडासारखा गुन्हा दाखल केला आणि अटकही केली. मात्र, मानकापूर पोलिसांनी खरा आरोपी शोधला आणि गुन्हे शाखेचा दावा खोटा ठरवला. परंतु, आपला संसार आणि मोलमजुरी करणाऱ्या रोहितचे आयुष्यात वादळ येण्यासाठी दोषी कोण? असा प्रश्न विचारला जात आहे.