मुंबई,
mannat to get a new look मुंबईतील 'मन्नत' या शाहरुख खान यांच्या आलिशान बंगल्याच्या नूतनीकरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय देत अभिनेता शाहरुख खान आणि गौरी खान यांना मोठा दिलासा दिला आहे. बंगल्याच्या नूतनीकरणासाठी मिळालेल्या कोस्टल रेग्युलेशन झोन (CRZ) मंजुरीविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. त्यामुळे 'मन्नत'मध्ये अतिरिक्त मजला उभारण्यासह नूतनीकरणाचे काम पुढे सुरू ठेवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी करताना राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या (NGT) निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. नूतनीकरणासाठी मंजुरी देताना संबंधित अधिकाऱ्यांनी कायद्यातील सर्व तरतुदींचे पालन केले असल्याचे न्यायालयाने नमूद केले. त्यामुळे या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट करत याचिका फेटाळण्यात आली.
मुंबईतील एका रहिवाशाने समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या 'मन्नत'च्या नूतनीकरणाला आव्हान देत न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, सुनावणीदरम्यान न्यायालयाने याचिकाकर्त्याच्या हेतूबाबतही प्रश्न उपस्थित केले. प्रथमदर्शनी या याचिकेमागील उद्देश संशयास्पद वाटत असल्याचे निरीक्षण नोंदवत कोणताही ठोस आधार नसल्याने न्यायालयाने याचिका फेटाळली. त्यामुळे नूतनीकरणाच्या कामावर कोणतीही स्थगिती राहिलेली नाही.
शाहरुख खान यांनी २००१ मध्ये हा बंगला खरेदी केला होता. त्यानंतर या निवासस्थानाला 'मन्नत' हे नाव देण्यात आले. सध्या नूतनीकरणाचे काम सुरू असल्यामुळे शाहरुख खान, पत्नी गौरी खान आणि मुले आर्यन, सुहाना व अबराम यांच्यासह मुंबईतील पाली हिल परिसरातील एका आलिशान अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास आहेत. वृत्तानुसार, चित्रपट निर्माता वासू भगनानी यांच्या इमारतीतील चार मजले त्यांनी भाड्याने घेतले आहेत.
कामाच्या आघाडीवर शाहरुख खान सध्या 'किंग' या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. या चित्रपटाच्या सेटवरील अनेक फोटो आणि व्हिडिओ अलीकडेच समोर आले आहेत. एका व्हायरल व्हिडिओमध्ये शाहरुख खान दीपिका पदुकोणसोबत चित्रीकरण करताना दिसत असून गरोदर दीपिकाची काळजी घेत असल्याचेही पाहायला मिळते. 'किंग' या चित्रपटात शाहरुख खान यांची मुलगी सुहाना खान मुख्य भूमिकेत झळकणार असून अभय वर्मा आणि अभिषेक बच्चन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.