माओवादी रवींद्र गंजूला यांना अटक

    दिनांक :14-Jul-2026
Total Views |
रांची, 
maoist ravindra ganju arrested झारखंड पोलिसांनी साेमवारी माओवादी प्रादेशिक कमांडर रवींद्र गंजू उर्फ सुरेंद्र गंजूला लातेहारच्या हेसला बंझी टोला या गावातून अटक केली. तो एक कुख्यात माओवादी असून त्याच्यावर अनेक मोठ्या गुन्ह्यांसह १५६ गुन्हे दाखल आहेत. झारखंड पोलिसांनी रवींद्रविरुद्ध १५ लाखांचे तर राष्ट्रीय तपास संस्थेनेही ५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. झारखंड पोलिसांनी त्याच्याकडून एक एके-५६ रायफलही जप्त केली आहे.
 
 

maoist ravindra ganju arrested
 
रवींद्र गंजूच्या अटकेमुळे लातेहार, लोहरदगा, चत्रा, पलामू, गरवा आदी भाग आता माओवाद्यांपासून पूर्णपणे मुक्त झाले आहेत. पथकातील वरिष्ठ माओवाद्यांच्या अटकेनंतर, आत्मसमर्पणानंतर आणि चकमकीत झालेल्या मृत्यूनंतर रवींद्र गंजू एकटाच उरला होता. पोलिस बऱ्याच काळापासून त्याचा शोध घेत होते. दरम्यान, तो त्याच्या हेसला या गावी परतल्याची गुप्त माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्याला घेरून अटक केली.
 
 
चार पोलिसांची केली हाेती हत्या
२२ नोव्हेंबर २०१९ रोजी रवींद्र गंजूच्या नेतृत्वात माओवादी पथकाने लातेहारच्या चांदवा येथील लुकैया मोडजवळ पोलिसांच्या गस्ती वाहनावर हल्ला केला. या हल्ल्यात एक एएसआय आणि तीन होमगार्ड शहीद झाले. हल्ल्यानंतर, माओवाद्यांनी पोलिसांची शस्त्रे आणि दारुगोळा लुटून पळ काढला. या प्रकरणात रवींद्र गंजू हवा होता. झारखंड पोलिस आणि एनआयएने या प्रकरणातील अनेक आरोपींना कायद्याच्या कचाट्यात आणले. माओवाद्यांना आर्थिक मदत पुरवणाऱ्या एका कंत्राटदारालाही अटक करण्यात आली आहे.
 
कटियामध्ये झालेल्या हल्ल्यात बारा जवान शहीद
७ जानेवारी २०१३ रोजी लातेहारच्या बरवाडीह पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कटिया जंगलात माओवाद्यांनी सुरक्षा दलांवर हल्ला केला. या हल्ल्यात बारा जवान शहीद तर १४ जण जखमी झाले हाेते. ज्या पोलिस वाहनात ही घटना घडली, ते वाहन माओवाद्यांनी आयईडीने उडवून दिले. तपासादरम्यान या प्रकरणात रवींद्र गंजूची भूमिकाही उघडकीस आली. या प्रकरणातही रवींद्र गंजू हवा होता.