शहरात वाढली हेल्मेट वापरणाऱ्यांची संख्या

पोलिसांच्या मोहिमेचा सकारात्मक परिणाम

    दिनांक :14-Jul-2026
Total Views |
अनिल कांबळे,
नागपूर
number-of-helmet-users : शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेले रस्ते अपघातांचे प्रमाण आणि अपघातांमध्ये बळी पावणाऱ्यांची संख्या लक्षात घेता वाहतूक पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेत कारवाईचा धडाका सुरू केला. गेल्या सहा महिन्यांत हेल्मेट न वापरणाऱ्या तब्बल २ लाख ६५ हजार ४३७ दुचाकीचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. वाहतूक पोलिसांनी सातत्याने राबविलेल्या विशेष मोहिमा, जनजागृती अभियान आणि कठोर दंडात्मक कारवाईमुळे हेल्मेट वापरणाऱ्या वाहनचालकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे शहरातील रस्ते सुरक्षेला बळ मिळत असून वाहतूक पोलिसांचा वचकही वाढल्याचे अर्धवार्षिक अहवालावरून समोर आले आहे.
 
 
 
Aditya-Mirkhelkar-DCP
 
 
 
वाहतूक पोलिसांनी जाहीर केलेल्या अर्धवार्षिक अहवालानुसार, गेल्या वर्षी २०२५ या संपूर्ण वर्षात हेल्मेट न वापरणाऱ्या तब्बल ६ लाख ९५ हजार ६१५ दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र, यावर्षी ३० जून २०२६ पर्यंत केवळ २ लाख ६५ हजार ४३७ वाहनचालकांवरच कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षी याच कालावधीत म्हणजे ३० जून २०२५ पर्यंत ६ लाख ६ हजार ४०१ वाहनचालकांवर हेल्मेट न वापरल्याबद्दल दंडात्मक कारवाई झाली होती. यंदा त्याच कालावधीत ही संख्या दुपटीहून अधिक घटल्याने शहरातील हेल्मेट वापरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे.
 
 
वाहतूक पोलिसांनी गेल्या काही महिन्यांपासून शहरातील प्रमुख चौक, शाळा-महाविद्यालय परिसर, व्यापारी भाग तसेच अपघातप्रवण रस्त्यांवर अपघात होऊ नये म्हणून विशेष काळजी घेतली. नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर ई-चालानद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना आणि नागरिकांच्या सहभागातून हेल्मेटच्या वापराबाबत जनजागृती कार्यक्रम, रॅली, प्रबोधनपर व्याख्याने आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यापक प्रचार करण्यात आला.
 
 
वाहतूक पोलिसांच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा परिणाम आता प्रत्यक्ष रस्त्यावर दिसू लागला आहे. पूर्वी अनेक दुचाकीस्वार हेल्मेट न घालताच दुचाकी चालविताना दिसत होते. मात्र आता बहुसंख्य वाहनचालक स्वतःच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा वापर करीत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अपघात झाल्यास डोक्याला गंभीर दुखापत होण्याचा धोका कमी होण्यास मदत होत आहे. नियमांचे पालन करणाऱ्या नागरिकांमुळे रस्ते अधिक सुरक्षित होत असून, जनजागृती आणि कठोर अंमलबजावणी यांचा संगमच अपघातमुक्त नागपूरच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
महाविद्यालयीन युवकांना घालावा आवर
 
 
वाहतूक शाखेचे तत्कालीन पोलिस उपायुक्त भारत तागडे यांनी शहरातील प्रत्येक महाविद्यालयाशी संपर्क करून रस्ता सुरक्षा आणि हेल्मेटबाबत जनजागृती केली होती. त्यानंतर जे विद्यार्थी हेल्मेट न घालता महाविद्यालयात येतील, त्यांच्या वाहनांना पार्किंगमध्ये प्रवेश नाकारण्यात येत होता. तसेच आरटीओ कार्यालयाशी समन्वय साधून विद्यार्थ्यांना वाहन परवाने देण्यासाठी शिबिरे आयोजित केली होती. त्यामुळे नव्या पोलिस उपायुक्तांनी याकडे लक्ष दिल्यास हेल्मेट वापरणाऱ्यांची संख्या वाढू शकते.
 
 
हेल्मेटचा वापर केवळ दंड टाळण्यासाठी नव्हे, तर स्वतःचा जीव वाचविण्यासाठी आवश्यक आहे. शहरातील वाढत्या वाहतुकीच्या पृष्ठभूमीवर प्रत्येक दुचाकीस्वाराने हेल्मेटचा वापर करणे गरजेचे आहे. पुढील काळातही हेल्मेट न वापरणाऱ्यांसाठी विशेष मोहीम कायम राहणार आहे.
- आदित्य मिरखेलकर (पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा)