सेलू
tiger-reserve राज्यातील बहुतांश व्याघ्र प्रकल्पांतील कोअर क्षेत्र मान्सून काळात पर्यटकांसाठी बंद असताना, वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुयातील बोर व्याघ्र प्रकल्पातील राहाटी बफर झोन संपूर्ण पावसाळाभर पर्यटकांसाठी खुला ठेवण्यात आला आहे. त्यामुळे निसर्गप्रेमी आणि वन्यजीव छायाचित्रकारांना हिरवाईने नटलेल्या जंगलात सफारीचा रोमांचक अनुभव घेण्याची अनोखी संधी उपलब्ध झाली आहे. मान्सूनच्या आगमनानंतर बोर व्याघ्र प्रकल्प परिसर हिरवागार झाला असून, डोंगररांगा, धबधबे, दाट वनराई आणि पक्ष्यांचा मधूर किलबिलाटामुळे परिसराचे सौंदर्य अधिक खुलून आले आहे. याच पृष्ठभूमीवर राहाटी बफर झोन पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरत आहे.
tiger-reserve वन विभागाच्या माहितीनुसार, राहाटी बफर क्षेत्रात १५ हून अधिक वाघ आणि ४० पेक्षा जास्त बिबट्यांचे अस्तित्व असून, याशिवाय अस्वल, सांबर, चितळ, नीलगाय, रानडुकर तसेच विविध प्रकारच्या हरिणांचेही दर्शन पर्यटकांना घडू शकते. याशिवाय मोठ्या प्रमाणावर देशी-विदेशी पक्ष्यांची उपस्थिती असल्याने हा परिसर पक्षीनिरीक्षक आणि वन्यजीव संशोधकांसाठीही विशेष महत्त्वाचा मानला जातो.
निसर्गसौंदर्य, समृद्ध जैवविविधता आणि शांत वातावरणामुळे बोर व्याघ्र प्रकल्पातील राहाटी बफर झोन हा मान्सून पर्यटनासाठी विदर्भातील एक महत्त्वाचे आकर्षण ठरत असून, पावसाळ्यात जंगल सफरीचा आनंद घेऊ इच्छिणार्या पर्यटकांसाठी ही सुवर्णसंधी मानली जात आहे.
tiger-reserve पर्यटकांना सुरक्षित व संस्मरणीय अनुभव देण्यावर भर : खेडकर
पावसाळ्यात वन्यजीवांच्या हालचाली वाढत असल्याने त्यांच्या दर्शनाची शयता अधिक असते. त्यामुळे पर्यटकांनी सफारीदरम्यान वन विभागाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे. नागपूर, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूरसह विदर्भातील विविध जिल्ह्यांतून येणार्या पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आली असून, प्रशिक्षित मार्गदर्शक आणि सफारी व्यवस्थापनाद्वारे पर्यटकांना सुरक्षित व संस्मरणीय अनुभव देण्यावर भर दिला जात असल्याची माहिती हिंगणी येथील वन परिक्षेत्र अधिकारी रुपेश खेडकर यांनी दिली.