बीजिंग,
rampaging floods in china चीनच्या हेबेई आणि लियाओनिंग प्रांतांमध्ये चक्रीवादळानंतर आलेल्या भीषण पुरामुळे रस्ते पाण्याखाली गेले असून, अनेक वाहने वाहून गेली. रेल्वे, विमानसेवा स्थगित करण्यात आली आहे. पुरामुळे २५ लाख नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले. भूस्खलन आणि पुलांच्या पडझडीमुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे.
आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, उत्तर हेबेई आणि ईशान्य लियाओनिंग प्रांतांमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे रस्ते पाण्याखाली गेले आणि वाहने वाहून गेली. कुआनचेंग काउंटीमधील रस्त्यांवर पाण्याची पातळी दोन मीटरपेक्षा जास्त आहे. कुआनचेंगमधील बहुतांश घरात पाणी शिरले असून, लोकांना जीव वाचवण्यासाठी उंच इमारतीचा आधार घ्यावा लागला. रस्त्यांना तलावाचे स्वरुप आले असून, महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याने मदत कार्यात अडचणी येत आहे. वादळामुळे जिलिन, लियाओनिंग, हेबेई, शांदोंग, जिआंग्सू आणि आन्हुई प्रांतांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे, ज्यामुळे अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.
अनेक भागांतील शाळा बंद
हेबेईच्या अधिकाऱ्यांनी वीचॅटवरील एका निवेदनात म्हटले की, मुसळधार पावसाच्या रेड अलर्ट दरम्यान, सर्व काम थांबवणे, व्यवसाय बंद ठेवणे आणि गर्दीवर कठोरपणे बंदी घालण्यात आली. शेनयांगमधील अनेक रेल्वे सेवाही स्थगित करण्यात आल्या असून, त्याचा परिणाम रेल्वेच्या ३० हून अधिक विभागांवर झाला आहे. ईशान्येकडील जिलिन प्रांतासह अनेक भागांतील शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.