मुंबई,
Salman Khan sells his luxurious flat बॉलिवूड अभिनेता सलमान खानने वांद्रे येथील आपला एक आलिशान फ्लॅट विकल्याची माहिती समोर आली आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, 2015 मध्ये 2.88 कोटी रुपयांना खरेदी केलेली ही मालमत्ता आता सुमारे 3.50 कोटी रुपयांना विकण्यात आली आहे. या व्यवहारातून सलमान खानला कोट्यवधी रुपयांचा नफा झाल्याचे सांगितले जात आहे. वृत्तानुसार, वांद्रे येथील 'शिव-आस्था हाइट्स' इमारतीतील 758 चौरस फुटांचे हे अपार्टमेंट विकण्यात आले आहे. या व्यवहारात फ्लॅटसोबत दोन कार पार्किंगच्या जागांचाही समावेश आहे. नोंदणी कागदपत्रांनुसार, या मालमत्तेचा दर प्रति चौरस फूट सुमारे 46 हजार रुपये निश्चित करण्यात आला होता.

ही मालमत्ता मुनिरा अकबर अली दांडावाला, महदियाली अकबर अली दांडावाला आणि झेहरा यांनी खरेदी केली आहे. या व्यवहारासाठी खरेदीदारांनी 21 लाख रुपयांची मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्युटी) आणि 30 हजार रुपयांचे नोंदणी शुल्क भरल्याची नोंद आहे. मात्र, या व्यवहाराबाबत सलमान खान किंवा नव्या मालकांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सलमान खान वांद्रे येथील 'गॅलेक्सी अपार्टमेंट'मधील आपल्या सध्याच्या निवासस्थानातून नवीन घरात जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.