वैष्णोदेवी मंदिरातील चांदी प्रकरण गाजले!

न्यायालयाने मागवला तपास अहवाल

    दिनांक :14-Jul-2026
Total Views |
जम्मू,
silver controversy at the Vaishno Devi temple माता वैष्णोदेवी तीर्थक्षेत्र मंडळाशी संबंधित सुमारे ५५० कोटी रुपयांच्या कथित बनावट चांदी अर्पण प्रकरणात जम्मू न्यायालयाने महत्त्वाची कारवाई केली आहे. मुख्य न्यायदंडाधिकारी मुनीश कुमार मनहास यांनी या प्रकरणाचा तपास करणाऱ्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याला सर्व संबंधित कागदपत्रांसह २९ जुलै रोजी न्यायालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयातील वकील दीपक शर्मा यांनी दाखल केलेल्या याचिकेनंतर न्यायालयाने हा आदेश दिला. त्यांनी मंदिरात भाविकांकडून अर्पण करण्यात आलेल्या चांदीच्या वस्तूंमध्ये कथित भेसळ, अदलाबदल आणि अपहार झाल्याचा आरोप केला आहे. ९ मे रोजी दाखल केलेल्या तक्रारीत गुन्हेगारी कट, फसवणूक, विश्वासघात, अपहार, कागदपत्रांमध्ये फेरफार तसेच कॅडमियमयुक्त बनावट चांदीची खरेदी-विक्री अशा गंभीर आरोपांचा समावेश करण्यात आला आहे.
 
 

silver controversy at the Vaishno Devi temple 
 
दीपक शर्मा यांनी यापूर्वी आयजीपी गुन्हे शाखा आणि एसएसपी आर्थिक गुन्हे शाखेकडे सखोल चौकशी करून एफआयआर दाखल करण्याची मागणी केली होती. मात्र अपेक्षित कारवाई न झाल्याने त्यांनी न्यायालयाचे दार ठोठावले. न्यायालयाच्या निर्देशानंतर गुन्हे शाखेने सद्यस्थिती अहवाल सादर केला. त्यामध्ये तक्रारीवर प्रशासकीय स्तरावर प्रक्रिया सुरू असल्याचे नमूद करण्यात आले होते.या अहवालावर आक्षेप घेताना दीपक शर्मा यांनी केवळ प्रशासकीय हालचाली म्हणजे कायदेशीर तपास होऊ शकत नाही, असा युक्तिवाद केला. भारतीय नागरी सेवा संहिता २०२३ अंतर्गत गुन्हे शाखा स्वतः अधिसूचित पोलीस ठाणे असल्याने अशा तक्रारींवर थेट कारवाई करणे तिचे कर्तव्य असल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
 
 
तसेच तपासादरम्यान इन्व्हेंटरी रजिस्टर, स्टॉक नोंदी, सीसीटीव्ही फुटेज, वाहतूक कागदपत्रे, प्रयोगशाळा चाचणी अहवाल, टांकसाळीशी झालेला पत्रव्यवहार तसेच प्रसादाच्या प्राप्ती, साठवणूक, वाहतूक, तपासणी आणि वितळवण्याशी संबंधित महत्त्वाच्या पुराव्यांचे संरक्षण करण्यात आल्याचा कोणताही उल्लेख अहवालात नसल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रकरणाला तेव्हा वाचा फुटली, जेव्हा मंदिरात जमा झालेली सुमारे २० टन चांदी, ज्याची अंदाजे किंमत ५५० कोटी रुपये आहे, तपासणी आणि प्रक्रियेसाठी पाठवण्यात आली. तपासादरम्यान केवळ ५ ते ६ टक्के चांदी शुद्ध असल्याचे, तर उर्वरित धातूमध्ये कॅडमियम, लोह आणि इतर निकृष्ट धातूंचा वापर झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर भक्तांना सुरुवातीपासूनच बनावट चांदी विकण्यात आली होती की नंतर मूळ चांदीमध्ये भेसळ, फेरफार, चोरी किंवा अपहार करण्यात आला, याचा सखोल तपास व्हावा, अशी मागणी याचिकाकर्ते दीपक शर्मा यांनी केली आहे. आता या प्रकरणातील पुढील सुनावणी २९ जुलै रोजी होणार असून, न्यायालयाच्या निर्देशानुसार तपास अधिकाऱ्याला सर्व नोंदींसह हजर राहावे लागणार आहे.