समय रैनाला सुप्रीम कोर्टाचा दणका!

    दिनांक :14-Jul-2026
Total Views |
नवी दिल्ली,
samay raina विनोदवीर समय रैना यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतली आहे. न्यायालयाची दिशाभूल केल्याचा आणि खोटी माहिती सादर केल्याचा ठपका ठेवत सर्वोच्च न्यायालयाने समय रैना आणि 'इंडियाज गॉट लेटेंट' या शोशी संबंधित आणखी एका विनोदवीराला प्रत्येकी ३ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. सुरुवातीला न्यायालयाने १० लाख रुपयांचा दंड निश्चित केला होता, मात्र नंतर तो कमी करून ३ लाख रुपये करण्यात आला.
 
samay raina
 
सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान नमूद केले की, समय रैनाने न्यायालयासमोर केलेली विधाने योग्य नसून त्यातून न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून येते. न्यायालयाने त्याच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत न्यायालयीन प्रक्रियेला गांभीर्याने घेण्याचे निर्देश दिले. दंडाची रक्कम निर्धारित वेळेत जमा न केल्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते, असा इशाराही न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणाची सुनावणी 'इंडियाज गॉट लेटेंट २०२५' या शोमधील वादग्रस्त भागाशी संबंधित आहे. या कार्यक्रमात करण्यात आलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांनंतर समय रैना आणि यूट्यूबर रणवीर अलाहाबादिया यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता. या वादानंतर समय रैनाने आपल्या शोचे सर्व भाग यूट्यूब आणि इतर डिजिटल प्लॅटफॉर्मवरून हटवले होते.
 
सुनावणीदरम्यान वकील अपराजिता सिंग यांनी समय रैनाच्या कार्यक्रमांवर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी न्यायालयात सांगितले की, अशा प्रकारच्या कार्यक्रमांमधून तरुणांवर चुकीचा प्रभाव पडू शकतो. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनीही यावेळी समाजातील तरुणांसाठी यापेक्षा चांगले आदर्श असल्याचे मत व्यक्त केले. भारताचे सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी समय रैनावर टीका करत सांगितले की, न्यायालयासमोर चुकीची माहिती देणे हे गंभीर स्वरूपाचे गैरवर्तन आहे. न्यायालयाच्या आदेशांचे पालन करणे आणि समाजातील लोकांच्या भावनांचा आदर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यानंतर खंडपीठाने दंडाची कारवाई केली.
 
या संपूर्ण वादाची सुरुवात जानेवारी २०२५ मध्ये झाली होती. समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' या शोच्या एका भागात यूट्यूबर रणवीर अलाहाबादियाने पालकांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका झाल्यानंतर या प्रकरणी तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. दरम्यान, समय रैना पुन्हा 'इंडियाज गॉट लेटेंट २' घेऊन परतला असून, त्यानंतरही काही वक्तव्यांमुळे तो चर्चेत आला. स्टँडअप कॉमेडियन प्रणीत मोरे यांच्या कार्यक्रमातील '३७० बिर्याणी' वादानंतर समय रैनाचा हार्ट अटॅकवर विनोद करणारा व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला.