काश्मीरच्या पर्वतीय भागाच्या तापमानात वाढ

पूर, भूस्खलन, पाणीटंचाईच्या समस्या गंभीर होण्याची शक्यता

    दिनांक :14-Jul-2026
Total Views |
नवी दिल्ली,
temperatures rise in kashmir आयआयटी खरगपूरच्या संशोधनानुसार, जम्मू आणि काश्मीरच्या पर्वतीय प्रदेशात मागील दोन दशकांत तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. जी हिमालयीन परिसंस्थेसाठी एक गंभीर धोका मानली जात आहे. मैदानी प्रदेशांपेक्षा उंच प्रदेश अधिक वेगाने उष्ण होत आहेत, असे या अभ्यासात दिसून आले आहे. हवामान बदलाचे सर्वात गंभीर परिणाम आता हिमालयीन प्रदेशात स्पष्टपणे दिसत आहेत. जम्मू आणि काश्मीरच्या पर्वतीय प्रदेशातील तापमान मागील दोन दशकांत सुमारे एक अंश सेल्सिअसने वाढले आहे.
 
 
temperatures rise in kashmir
 
हा कल असाच सुरू राहिला, तर हिमालयातील हिमनद्या वेगाने आकुंचन पावतील. ज्यामुळे पूर, भूस्खलन आणि पाण्याची टंचाई यांसारख्या भविष्यातील समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, खरगपूर येथील सेंटर फॉर ओशन, रिव्हर, ॲटमॉस्फियर अँड लँड सायन्सेसच्या शास्त्रज्ञांनी जम्मू आणि काश्मीरच्या हिमालयीन प्रदेशाचा सविस्तर अभ्यास केला आहे. हे संशोधन ‘सायंटिफिक रिपोर्ट्स’ या नियतकालिकेमध्ये प्रकाशित झाले आहे.
 
या अभ्यासात १९८० ते २०२४ पर्यंतच्या माहितीचे विश्लेषण करण्यात आले. ज्यातून पर्वतीय प्रदेशांमध्ये तापमानवाढीत झपाट्याने वाढ होत असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. सखल भागांपेक्षा उंच प्रदेश अधिक वेगाने उष्ण होत आहेत. मध्यम उंचीच्या पर्वतीय प्रदेशांमध्ये तापमान दर दशकात ०.३ अंश सेल्सिअसच्या दराने वाढत आहे, तर जम्मूसारख्या मैदानी प्रदेशात ही वाढ दर दशकात अंदाजे ०.१ अंश सेल्सिअस इतकी नोंदवली गेली, असे या अभ्यासात दिसून आले. हिमालयाला आशियाचा जलस्रोत म्हटले जाते, कारण येथून उगम पावणाऱ्या गंगा, सिंधू आणि ब्रह्मपुत्रा यांसारख्या नद्या लाखो लोकांच्या पिण्याच्या पाण्याची, सिंचनाची आणि ऊर्जेची गरज भागवतात.
 
 
हिमनदी वितळण्याचा सध्याचा वेग असाच सुरू राहिला, तर सुरुवातीच्या वर्षांमध्ये अचानक येणारे पूर आणि भूस्खलन वाढतील, तर दीर्घकाळात, नदीचा प्रवाह कमी झाल्यामुळे तीव्र पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. याचा थेट परिणाम शेती, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आणि जलविद्युत निर्मितीवर होईल, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
 
 
उत्तम देखरेख आणि अनुकूलनाची गरज
संशोधकांच्या मते, हिमालय हा जगातील सर्वात असुरक्षित पर्वतीय प्रदेशांपैकी एक आहे आणि हवामान बदलाचा परिणाम सर्व उंचीवर सारखा नाही. त्यामुळे, पर्वतीय प्रदेशांमध्ये हवामानावर सखोल देखरेख ठेवणे, अधिक अचूक हवामान मॉडेल विकसित करणे आणि स्थानिक परिस्थितीनुसार अनुकूलन धोरणांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. वेळेवर प्रभावी उपाययोजना केली नाही, तर येत्या काही वर्षांत हिमालयातील वाढत्या उष्णतेचा जलस्रोत, पर्यावरण आणि लाखो लोकांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम होऊ शकतो, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.