पर्यावरण संवर्धनासाठी मंगरूळनाथ शहरात उत्साहात वृक्षदिंडी

-चला झाडे लावू दारोदार, शहर करू हिरवेगारचा संदेश -महिला पुरुष व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

    दिनांक :14-Jul-2026
Total Views |
मंगरूळनाथ,
environmental conservation पर्यावरणाचा समतोल राखणे, वृक्षसंवर्धनाची जनजागृती करणे आणि प्रत्येक नागरिकामध्ये वृक्षलागवडीची भावना रुजविण्याच्या उद्देशाने शहरात १३ जुलै रोजी दुपारी १ वाजता उत्साहपूर्ण वातावरणात वृक्षदिंडी काढण्यात आली. चला झाडे लावू दारोदार, शहर करू हिरवेगार हा संदेश देत विविध सामाजिक, शैक्षणिक, महिला व युवक संघटनांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
 

environmental conservation 
 
 
गजानन महाराज मंदिर, लक्ष्मी विहार कॉलनी येथून वृक्षदिंडीला प्रारंभ झाला. त्यानंतर अकोला चौक, बिरबलनाथ मंदिर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आदी प्रमुख मार्गांवरून दिंडी काढण्यात आली. मार्गात पर्यावरण संरक्षण, वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धनाचे महत्त्व सांगणार्‍या घोषणा देण्यात आल्या. नागरिकांना प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन करण्यात आले. या वृक्षदिंडीमध्ये आ. श्याम खोडे, पुरुषोत्तम चितलांगे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या वृक्ष दिंडीमध्ये सहभागी झालेल्या महिला हिरव्या रंगाच्या साड्यांमध्ये सहभागी झाल्याने संपूर्ण वातावरण अधिक आकर्षक व प्रेरणादायी बनले. युवकांनी पर्यावरणविषयक फलक हातात घेऊन नागरिकांना प्लास्टिकमुक्त परिसर, पावसाचे पाणी साठवण, जलसंवर्धन आणि वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला. यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, वाढते तापमान, अनियमित पाऊस, भूजल पातळीतील घट आणि प्रदूषण या गंभीर समस्यांवर मात करण्यासाठी वृक्षलागवड हा सर्वात प्रभावी उपाय आहे. केवळ झाडे लावून थांबणे पुरेसे नसून त्यांचे संगोपन करणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे. वृक्ष हे पर्यावरणाचे खरे रक्षक असून भावी पिढ्यांसाठी हरित वारसा निर्माण करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी शहरातील विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.environmental conservation पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करणारी माहितीपत्रके वाटप करण्यात आली. नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत करत आपल्या परिसरात अधिकाधिक वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केला. पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये शहराने पुन्हा एकदा सक्रिय सहभाग नोंदविल्याचे या वृक्षदिंडीतून दिसून आले. वाढत्या पर्यावरणीय संकटाच्या पार्श्वभूमीवर अशा जनजागृती मोहिमा काळाची गरज असून, वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धनाची चळवळ लोकसहभागातून अधिक व्यापक करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. या वृक्षदिंडीमध्ये सिद्धार्थ विद्यालयासह विविध शैक्षणिक संस्थांचे विद्यार्थी सहभागी झाले होते.