तुकाराम मुंढेंच्या मोहिमेनंतर श्रेयस तळपदेची कबुली

    दिनांक :14-Jul-2026
Total Views |
मुंबई,
Tukaram Mundhe's and Shreyas Talpade राज्यात अन्नपदार्थांमधील भेसळीविरोधात अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सुरू केलेल्या धडक कारवाईनंतर सर्वसामान्यांसह सेलिब्रिटींमध्येही जागरूकता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर मराठी अभिनेता श्रेयस तळपदे याने आपल्या घरातील आहारात मोठे बदल केल्याचे सांगितले आहे. भेसळीच्या वाढत्या घटनांमुळे दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा वापर जवळपास बंद केल्याची माहिती त्याने एका मुलाखतीत दिली. श्रेयस तळपदेचा 'द इंडियन स्टोरी' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत असून, सध्या तो चित्रपटाच्या प्रचारात व्यस्त आहे. 24 जुलै रोजी प्रदर्शित होणाऱ्या या कोर्टरूम ड्रामामध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री काजल अग्रवालही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
 
 

sheyash 
मुलाखतीत बोलताना श्रेयस तळपदे म्हणाला की, सोशल मीडियावर भेसळीबाबत अनेक व्हिडिओ फिरत असले तरी त्यातील सर्वच माहिती खरी असेल असे नाही. मात्र, त्यातील काही घटनांमध्ये तथ्य असल्याचे दिसते. विशेषतः तुकाराम मुंढे यांनी सुरू केलेल्या कारवाईनंतर समोर आलेले वास्तव चिंताजनक असल्याने त्यांच्या कुटुंबाने दुग्धजन्य पदार्थांचा वापर मोठ्या प्रमाणात कमी करण्याचा निर्णय घेतला.तो पुढे म्हणाला की, यापूर्वी त्यांच्या घरी आठवड्यातून सात ते आठ वेळा पनीर किंवा इतर दुग्धजन्य पदार्थांचा वापर होत असे. मात्र आता मुलीच्या आहारातूनही दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे प्रमाण कमी करण्यात आले आहे. स्वतः रात्री हळदीचे दूध पिण्याची सवयही त्यांनी बंद केली असून, चहातही अत्यल्प दूध वापरले जाते. अनेकदा ब्लॅक कॉफी किंवा कोरा चहा पिण्याला ते प्राधान्य देत असल्याचे त्यांनी सांगितले. श्रेयसने सांगितले की, घरात पनीर खायचे असल्यास ते केवळ विश्वासार्ह ठिकाणाहूनच आणले जाते. तसेच बाजारातून आणलेल्या पालेभाज्या अनेक वेळा स्वच्छ धुवून आणि उकळून वापरल्या जातात. कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शक्य त्या सर्व खबरदारी घेत असल्याचेही त्याने स्पष्ट केले.