रिसोड,
accident in leh लेह येथे पर्यटनासाठी गेलेल्या दोन युवकांचा भिषण अपघात होऊन मृत्यू झाल्याची घटना १२ जुलै रोजी दुपारच्या सुमारास घडल्याने जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ७ जुलै रोजी जिल्ह्यातील व परिसरातील आठ युवक लेह लद्दख येथे पर्यटनासाठी गेले होते. १२ जुलै रोजी बाईकने पर्यटन करीत असताना समोरून येणार्या सैन्य दलाच्या वाहणाला बाईकची धडक लागून रिसोड येथील अॅड. कुणाल चोपडे (वय २४) व कारंजा येथील अॅड. राघव देशपांडे (वय २५) यांचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे दोन्ही युवकांनी कायद्याचे शिक्षण पूर्ण करून नुकतीच त्यांना बार कौन्सिल महाराष्ट्र व गोवा कडून सनद प्राप्त झाली होती.
आयुष्याचे स्वप्न पूर्ण होण्याआधीच त्यांच्यावर काळाने घाला घातल्याने जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. १२ जुलै रोजी शहरात सायंकाळी या घटनेचे वृत्त माहित होताच नातेवाईक व मित्रपरिवार दुःख सागरात बुडाला. दुःख विसरून मित्रपरिवारने पुढील प्रक्रिया पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू केले. लेह मधील सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याची काळजी मित्रपरिवार समोर होती. अखेर माजी आमदार अॅड. विजय जाधव यांना फोनद्वारे माहिती देण्यात आली. त्यांनी घटनेची संपूर्ण माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे स्वीय सहाय्यक दीपक शिंदे यांना व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक अमोल पाटणकर यांना दिली. अमोल पाटणकर यांनी लेहचे जिल्हा पोलिस अधीक्षक रियाज यांच्याशी संपर्क करून माहिती दिली व युवकांना सर्व ती मदत करण्याची विनंती केली. आमदार अमित झनक यांनीही पोलिस अधीक्षक रियाज यांच्याशी संपर्क करून मदत करण्याची विनंती केली. जिल्हा पोलिस अधीक्षक रियाज यांनी शुभम खोडकेशी संपर्क करून संपूर्ण माहिती घेतली.accident in leh दवाखान्याचे अधीक्षकांशी बोलून युवकांना सर्व मदत करण्याचे सांगितले. १३ जुलै रोजी सकाळी पोस्टमार्टम करून सर्व कायदेशीर प्रक्रिया करून १४ जुलै रोजी विमानाने लेह वरून प्रथम दिल्ली नंतर नागपूर व नागपूर वरून रुग्णवाहिकेने राघव देशपांडे यांचा मृतदेह कारंजा येथे तर कुणाल चोपडेचा मृतदेह रिसोड येथे आणण्यात आला. विमान प्रवासाचे तिकिटे काढण्यासाठी यवतमाळ वाशीमचे खासदार संजय देशमुख यांचे स्वीय सहाय्यक प्रतीक सोळुंके यांनी मदत केली. कुणाल चोपडे हा पत्रकार सतीश चोपडे यांचा पुतण्या तर संतोष चोपडे लेखाधिकारी नगरपरिषद दिग्रस यांचा मुलगा आहे. १४ जुलै रोजी दोघांच्याही पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आला.
नागरिकांनी जोपासली सामाजिक बांधिलकी
अपघात झाला परंतु, दोन्ही युवक दवाखान्यात उपचार घेत आहेत, अशी माहिती आई वडील यांना देण्यात आल्याने कोणाही नागरिकांने अपघाताचे वृत्त सोशल मीडियावर शेअर केले नाही. पत्रकार बांधवांनी वृत्तपत्रामधून बातमी दिली नाही. आई वडील व परिवाराला त्रास होऊ न देण्याची सामाजिक बांधिलकी नागरिकांनी जोपासली.