अनिल कांबळे
नागपूर,
Union Minister Nitin Gadkari केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याबाबत इथेनॉल विषयावर कथितपणे दिशाभूल करणारी, तथ्यहीन आणि बदनामीकारक माहिती सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी बिहारमधील युट्यूबर मनीष कश्यपसह चार सोशल मीडिया अकाउंटधारकांविरुद्ध सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भाजप नागपूर शहर सोशल मीडिया सेलच्या पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.
भाजप नागपूर शहर सोशल मीडिया सेलचे संयोजक शिशिर त्रिपाठी, सहसंयोजक संपत पांडे आणि आदित्य जुमा यांनी संयुक्तरित्या सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, ३ जुलै रोजी सकाळी सुमारे ११ ते ११.३० वाजताच्या दरम्यान ‘मनीष कश्यप बिहार’ या युट्यूब चॅनलवर इथेनॉल विषयासंदर्भातील एक व्हिडिओ प्रसारित करण्यात आला. या व्हिडिओमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात कथितपणे खोटे, दिशाभूल करणारे आणि त्यांची प्रतिमा मलिन करणारे आरोप करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. तक्रारीत पुढे नमूद करण्यात आले आहे की, ‘देसी बॉयज’, ‘हर्षित राठी’ आणि ‘अंकलेश इनवाती’ या नावांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरूनही इथेनॉल विषयावर आक्षेपार्ह आणि दिशाभूल करणारे व्हिडिओ प्रसारित करण्यात आले. या पोस्ट आणि व्हिडिओंच्या माध्यमातून जनतेची दिशाभूल करण्याचा तसेच सार्वजनिक शांतता आणि कायदा-सुव्यवस्थेवर परिणाम घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. तक्रारदारांनी संबंधित सोशल मीडिया पोस्ट आणि व्हिडिओंचे पुरावे पोलिसांकडे सादर केले आहेत. त्याआधारे सायबर पोलिसांनी चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ मधील कलम ३५२, ३५६ आणि २९६ तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० मधील कलम ६७ अंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून खोटी, दिशाभूल करणारी, एखाद्या व्यक्तीची प्रतिमा मलिन करणारी किंवा सार्वजनिक शांतता भंग होईल अशी सामग्री प्रसारित करणाऱ्यांविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.