वॉशिंग्टन,
US action against Iran's naval facilities मध्य पूर्वेतील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने इराणविरोधात प्रथमच सागरी ड्रोनचा वापर करत मोठी लष्करी कारवाई केली आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी इराणमधील पाणबुडी आणि जहाज देखभाल केंद्रावर अनेक एकमार्गी हल्ला करणाऱ्या ड्रोनच्या मदतीने अचूक हल्ले करण्यात आले.सेंट्रल कमांडने 'एक्स'वरील अधिकृत पोस्टमध्ये या कारवाईची पुष्टी करत, ड्रोनच्या साहाय्याने इराणच्या नौदलाशी संबंधित महत्त्वाच्या तळावर यशस्वी हल्ला केल्याचे म्हटले आहे. अमेरिकेने लढाऊ मोहिमेत सागरी ड्रोनचा वापर करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

या कारवाईदरम्यान इराणच्या महत्त्वाच्या बंदर अब्बास परिसरालाही लक्ष्य करण्यात आले. अमेरिकेच्या लष्कराने या हल्ल्यामुळे व्यापारी जहाजांवर हल्ले करण्याची इराणची क्षमता कमी झाल्याचा दावा केला आहे.यापूर्वी अमेरिकेने इराणमधील हवाई संरक्षण यंत्रणा, रडार केंद्रे, क्षेपणास्त्र प्रणाली, ड्रोन उपकरणे आणि लहान लष्करी नौकांसह डझनभर लक्ष्यांवरही हल्ले केल्याची माहिती दिली होती. दुसरीकडे इराणकडून कतार, बहरीन, जॉर्डन आणि ओमानमधील अमेरिकन तळांवरही हल्ले सुरू असल्याने दोन्ही देशांतील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे.
दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी सकाळी होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत मोठे विधान केले. "आम्ही होर्मुझच्या सामुद्रधुनीवर ताबा मिळवला आहे," असा दावा त्यांनी केला. तसेच इराणने सामुद्रधुनी बंद केल्याचा दावा फेटाळून लावत, "होर्मुझची सामुद्रधुनी खुली आहे आणि इराणने सहकार्य केले किंवा नाही केले तरी ती कायम खुली राहील," असे ट्रम्प म्हणाले. अमेरिका आणि इराणमधील वाढत्या संघर्षामुळे जून महिन्यात झालेल्या अंतरिम करारावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. इराणच्या 'फर्स' आणि 'तस्नीम' वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी कुवेत आणि इराकजवळील नैऋत्य इराणच्या तेल उत्पादक भागात अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला.