मध्य पूर्व पुन्हा रणांगण; अमेरिकेचा हल्ला, इराणचे जोरदार प्रत्युत्तर

    दिनांक :14-Jul-2026
Total Views |
तेहरान,
US attack, Iran's retaliation अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष पुन्हा तीव्र झाला असून, दोन्ही देशांकडून एकमेकांच्या लष्करी तळांवर हल्ल्यांचे दावे करण्यात येत आहेत. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने (CENTCOM) दिलेल्या माहितीनुसार, 13 जुलैच्या रात्री इराणमधील अनेक लष्करी ठिकाणांवर सुमारे पाच तास चाललेली कारवाई करण्यात आली. या कारवाईत बुशेहर, चाबहार, जास्क, कोनारक, अबू मुसा आणि बंदर अब्बास येथील लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. अमेरिकेच्या म्हणण्यानुसार, इराणची संरक्षण यंत्रणा, क्षेपणास्त्र तळ, ड्रोन सुविधा आणि नौदलाची क्षमता कमकुवत करण्यासाठी हे हल्ले करण्यात आले. तसेच मध्य पूर्वेत 50 हजारांहून अधिक अमेरिकी सैनिक उच्च सतर्कतेवर तैनात असल्याची माहितीही देण्यात आली आहे.

US attack, Iran
 
दुसरीकडे, इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) बहरीनमधील अल-जुफैर येथील अमेरिकी लष्करी तळावरील शस्त्रसाठा, उपग्रह दळणवळण केंद्र आणि सैनिकांच्या इमारतीवर प्रत्युत्तरात्मक हल्ला केल्याचा दावा केला आहे. याशिवाय अमेरिकेचे MQ-1 हे मानवरहित लष्करी विमान पाडल्याचाही दावा इराणने केला आहे.संघर्ष अधिक तीव्र होत असताना होर्मुझ सामुद्रधुनी परिसरात दोन सुपर ऑइल टँकर्सवर हल्ला झाल्याचेही वृत्त आहे. संयुक्त अरब अमिरातीने आपल्या दोन तेलवाहू टँकर्सवर हल्ला झाल्याचा आरोप केला असून, या घडामोडींमुळे जागतिक ऊर्जा बाजारात मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे.
युद्धाच्या परिणामांचा फटका कच्च्या तेलाच्या दरांनाही बसला आहे. ब्रेंट क्रूडचा दर प्रति बॅरल जवळपास 85 डॉलरपर्यंत, तर WTI क्रूडचा दर जवळपास 80 डॉलरपर्यंत पोहोचला आहे. तेलाच्या किमती सुमारे दोन टक्क्यांनी वाढून महिनाभरातील उच्चांकावर गेल्याने जागतिक इंधन पुरवठा, सागरी व्यापार आणि महागाईबाबत चिंता वाढली आहे. दरम्यान, संयुक्त राष्ट्रांमध्ये इराणने अमेरिका शांतता कराराचे उल्लंघन करत असल्याचा आरोप केला आहे. दोन्ही देशांमध्ये यापूर्वी शांतता करारावर सहमती झाली होती. मात्र, होर्मुझच्या सामुद्रधुनीत दोन जहाजांवर झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेने लष्करी कारवाई केली आणि त्यानंतर दोन्ही देशांतील संघर्ष पुन्हा चिघळला.