बर्मिंगहॅम,
Virat and Gambhir face off भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला आजपासून सुरुवात होत असून, त्याआधी भारतीय संघाच्या सराव सत्रातील काही दृश्यांमुळे विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर पुन्हा चर्चेत आले आहेत. टी-20 मालिकेत भारताला इंग्लंडकडून 4-0 असा पराभव पत्करावा लागल्यानंतर आता वनडे मालिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुढील वर्षी होणाऱ्या आयसीसी वनडे विश्वचषकाच्या तयारीसाठी ही मालिका महत्त्वाची मानली जात आहे.मालिकेपूर्वी भारतीय संघाने बर्मिंगहॅममधील एजबेस्टन मैदानावर अधिकृत सराव केला. या सरावाआधी दोन दिवस अनौपचारिक सराव सत्रही पार पडले होते. त्यामध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, शुभमन गिल, केएल राहुल, कुलदीप यादव, गुरनूर ब्रार आणि जसप्रीत बुमराह यांनी सहभाग घेतला होता.

सरावादरम्यान विराट कोहली आणि भारतीय वनडे संघाचा कर्णधार शुभमन गिल यांच्यात बराच वेळ चर्चा झाल्याचे पाहायला मिळाले. संघरचना, आगामी वनडे विश्वचषक आणि संघातील संयोजनाबाबत दोघांमध्ये चर्चा झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. विराटने सुरुवातीला क्षेत्ररक्षणाचा सराव केला आणि त्यानंतर सुमारे 30 ते 40 मिनिटे नेट्समध्ये फलंदाजी केली. फलंदाजी पूर्ण झाल्यानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याशी त्याची चर्चा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र त्याऐवजी फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांनी विराटशी संवाद साधला. त्यानंतर कोटक यांनी गौतम गंभीर यांच्याशी चर्चा केल्याचेही दिसून आले.सरावादरम्यान गौतम गंभीर यांनी रोहित शर्मा, शुभमन गिल, गुरनूर ब्रार यांच्यासह इतर अनेक खेळाडूंशी संवाद साधला.
मात्र विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात कोणतीही चर्चा झाल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे दोघांमधील संबंधांबाबत पुन्हा तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. तथापि, केवळ सरावातील दृश्यांच्या आधारे विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात मतभेद असल्याचा निष्कर्ष काढता येणार नाही. दोघांनी एकमेकांशी संवाद साधला नसल्याचे दिसले असले, तरी त्यामागील कारण स्पष्ट झालेले नाही. यापूर्वी मैदानावरील वादांमुळे दोघेही चर्चेत राहिले असल्याने या दृश्यांची सोशल मीडियावर आणि क्रिकेट वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.