कारंजा लाड,
Wife murdered in car on Samruddhi Mahamarg समृद्धी महामार्गावर कारमध्ये पत्नीची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह घेऊन अनेक तास फिरल्यानंतर आरोपी पतीने अखेर कारंजा शहर पोलिस ठाण्यात हजर होत शरणागती पत्करल्याची धक्कादायक घटना आज, १४ जुलै रोजी पहाटे उघडकीस आली. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सलमान खान नेक मोहम्मद (वय ३०) रा. कलवर्धा, जि. गौतमबुद्ध नगर, उत्तर प्रदेश. हा पत्नी हसीनबानो सलमान खान (वय २५) व आपल्या तीन लहान मुलांसह कारने समृद्धी महामार्गावरून ग्रेटर नोएडाकडे जात होता. कारंजा परिसरात महामार्गावर त्याने कार थांबवून प्रथम लोखंडी रॉडने पत्नीच्या डोक्यावर वार केल्याचा आणि त्यानंतर गळा आवळून तिची हत्या केल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात येत आहे.

घटनेनंतर आरोपीने पत्नीचा मृतदेह कारमध्येच ठेवून अनेक तास विविध ठिकाणी फिरल्याचे सांगितले जात आहे. अखेर तो सकाळी कारंजा शहर पोलिस ठाण्यात पोहोचला आणि पोलिसांसमोर शरण आला. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. मृतदेह शवविच्छेदन गृहात ठेवण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीत आरोपीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने तिची हत्या केल्याचे पोलिसांना सांगितल्याची माहिती आहे. फिरण्यासाठी बाहेर घेऊन जात असल्याचे सांगून त्याने ही घटना घडविल्याचा संशय आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात अनेक संशयास्पद बाबी समोर येत आहेत. कारमध्ये पती-पत्नी व मुलांव्यतिरिक्त आणखी एखाद्या व्यक्तीचा सहभाग होता का याचाही तपास सुरू आहे. तसेच आरोपी पोलिसांना वारंवार वेगवेगळी माहिती देत असल्याने त्याच्या जबाबातील विसंगतीचीही चौकशी केली जात आहे. त्यामुळे मृत महिलेची ओळख आणि घटनेमागील नेमके कारण याबाबतही पोलिस सर्व बाजूंनी तपास करीत आहेत. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शहर पोलिसांनी घटनास्थळाची व वाहनाची तपासणी करण्यासाठी फॉरेन्सिक पथकाला पाचारण केले. वैज्ञानिक पुरावे संकलित करण्यात आले असून, शवविच्छेदन अहवाल व फॉरेन्सिक तपासणीनंतर हत्येचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शहर पोलीस करीत आहे.