14 वर्षीय शाळकरी मुलगी बेपत्ता

अज्ञाताविरुद्ध अपहरणाचा गुन्हा

    दिनांक :15-Jul-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
वणी, 
schoolgirl-missing : शहरातून 14 वर्षीय अल्पवयीन शाळकरी मुलगी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेऊनही तिचा ठावठिकाणा न लागल्याने वणी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध मुलीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
 
 
j
 
 
 
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मुलगी शहरातील एका शाळेत इयत्ता नववीत शिक्षण घेत असून ती आजी-आजोबांसोबत राहत होती. तिचे आई-वडील शेतीच्या कामानिमित्त गावी वास्तव्यास आहेत. शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ती मैत्रिणीकडे जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडली. मात्र, बराच वेळ उलटूनही ती घरी परतली नाही.
 
 
यानंतर कुटुंबीयांनी नातेवाईक, मित्रपरिवार तसेच शहरातील विविध ठिकाणी तिचा शोध घेतला. मात्र, तिच्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर मुलीच्या आईने वणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
 
 
तक्रारीत संबंधित मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असूनही अज्ञात व्यक्तीने तिच्या अज्ञानाचा फायदा घेत तिला फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी वणी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता 137(2) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
 
 
पोलिसांनी मुलीचा शोध घेण्यासाठी विविध पथके कार्यरत केली असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी तसेच अन्य तांत्रिक माध्यमांतून शोधमोहीम सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. पुढील तपास वणी पोलिस करीत आहेत.