विजय माहुरे
सेलू,
pandhan roads तालुक्यात ३८ पांदण रस्त्याला मंजुरी मिळाली असली तरी पावसाळा सुरू होण्यापूर्वी फक्त दोनच रस्ते पूर्ण झाले आहे. तर ७ रस्त्याची कामं सुरू आहे. असे असले तरी उर्वरित त्या २९ पांदण रस्त्यांचा मुहूर्त कधी निघणार, याकडे शेतकर्यांचे लक्ष लागले आहे.
तालुक्यात मातोश्री पांदण रस्त्यांकरिता ३८ पांदण रस्त्यांची २०२४-२५ मध्ये निवड करण्यात आली. त्यापैकी फक्त १६ पांदण रस्त्याच्या निविदा काढून पुरवठादार निवडण्यात आले. काही पुरवठादारांनी हे काम न केल्यामुळे २०२६ मध्ये नवीन पुरवठादारांना काम देण्यात आले. सदर काम ग्रा.पं. अंतर्गत मनरेगातून करावयाचे असल्याने गावातील नागरिकांना या कामात हातभार लावायचा होता. त्याचा मोबदलाही मिळणार आहे. या योजनेत नागरिकांना रोजगार देणे सोबतच शेतात जाणारा रस्ता पक्का करणे हे शासनाचे उद्दिष्ट आहे. तालुक्यात ३८ पांदण रस्त्याला मंजुरी असली तरी प्रत्यक्षात १६ रस्त्याच्या निविदा झाल्या. त्यापैकी ७ रस्त्यांचे काम सुरू असून कान्हापूर ग्राम पंचायत अंतर्गत येणारे दोन रस्ते पूर्ण झाले. तर पळसगाव बाई १, टाकळी किटे १, रमणा २, रेहकी २, येळाकेळी १ या ग्रामपंचायत मधील पांदण रस्त्याचे काम प्रगती पथावर आहे. शासनाने मातोश्री पांदण रस्ता योजना अंमलात आणली असली तरी या कामाची कासवगती पाहता मंजूर झालेले पांदण रस्ते पूर्ण होण्यास किती वर्ष लागणार तसेच इतर पांदण रस्त्याचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
चौकट
२९ पांदण रस्त्यांना मुहूर्ताचा शोध
ज्या १६ पांदण रस्त्याच्या निविदा काढून पुरवठादार निवडण्यात आले त्यापैकी २ पूर्ण व ७ रस्त्याचे काम सुरू आहे तर ७ पांदण रस्त्यांची कामे अद्याप सुरूच व्हायची आहेत. उर्वरित २९ पांदण रस्त्यांना मुहूर्ताचा शोध असून त्यात सुरगाव २, वाहितपूर १, महाबळा ३, खापरी २, कोटंबा १, चारमंडळ १, खैरी कामठी १, टाकळी झडशी १, झडशी १, सालई कला १, सोडी १, नानबर्डी २, वडगाव खुर्द २, आमगाव ज. १, आकोली ३, जामणी १, येळाकेळी ३, सेलडोह १, जुवाडी १ या ग्रापं अंतर्गत येणार्या पांदण रस्त्यांना प्रतीक्षा कायम आहे.